लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एखादा दुकानदार कोरोनाग्रस्त निघाल्यास त्याचे दुकान २८ दिवस बंद ठेवू नये. औद्योगिक क्षेत्राप्रमाणेच दुकानाचा परिसर तीन दिवसात सॅनिटाईज्ड करून दुकान सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी गांधीबाग होलसेल क्लॉथ अॅण्ड यार्न मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अजय मदान यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. अशा कठोर कारवाईमुळे दुकानदाराना आर्थिक नुकसान सोसावे लागते, याकडे मदान यांनी आयुक्तांचे लक्ष वेधले आहे.
मदान म्हणाले, गांधीबाग परिसरात पाटणी भवन येथील एक दुकान अनेक दिवसांपासून बंद आहे. संपूर्ण इमारत सील केली आहे. त्यामुळे इमारतीतील इतर दुकानदारांचाही व्यवसाय बंद आहे. कोरोनाग्रस्त दुकानदार बरा होऊन घरी परतला आहे. पण त्याचे दुकान बंद आहे. दुकान सुरू करण्यास परवानगी मिळविण्यासाठी मनपाकडे परवानगी मागितली आहे. पण त्याचे दुकान सुरू झालेले नाही. आधीच आॅड-इव्हनने व्यवसाय डबघाईस आला आहे. अशा स्थितीत अनेक दिवस दुकान बंद राहिल्यास व्यावसायिकाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. औद्योगिक क्षेत्रात कामगार कोरोनाग्रस्त मिळाल्यास परिसर तीन दिवसात सॅनिटाईज्ड करून काम सुरू होते. असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. असे असताना दुकानदारांसाठी दुसरा नियम नको. व्यावसायिकाचे दुकानही तीन दिवसात सुरू व्हायला पाहिजे.
मदान म्हणाले, अन्य शहरांमध्ये कुणी व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळून आल्यास त्याचा फ्लॅट काही दिवसांसाठीच सील करण्यात येतो आणि सोसायटीतील रहिवाशांचे जीवनचक्र नियमित सुरू असते. पण नागपुरात याउलट सुरू आहे. संपूर्ण परिसर २८ दिवसांसाठी सील करण्यात येत असल्याने दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कामगारांचा पगार, बँकाच्या कर्जाचे व्याज, विजेचे बिल आणि इतर खर्चामुळे व्यावसायिक अडचणीत आहे. त्यातच मनपाच्या नियमामुळे त्यांच्यासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. एखादा दुकानदार कोरोनाग्रस्त झाल्यास त्याच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. अशा स्थितीत त्याला समाजातून विरोध होतो. ही बाब बदलण्याची गरज असल्याचे मदान यांनी स्पष्ट केले. गणेशपेठ भागात एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये एक व्यक्ती कोरोनाग्रस्त निघाल्यानंतर मनपाने फ्लॅटपासून ५० मीटर दूर असलेल्या ५५ दुकानांना सील लावले होते. ही दुकाने तब्बल एक महिन्यानंतर सुरू झाली होती, हे विशेष.