लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समुद्रपूर तालुक्यातील जाम ऐवजी वर्धा शहरामध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरू करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली. न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांनी हा निर्णय दिला.
सुरेश दुधे यांनी ही याचिका दाखल केली होती. सुरुवातीला वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे हे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मंजूर झाले होते. परंतु, त्याकरिता आवश्यक जमीन मिळाली नाही. परिणामी, सप्टेंबर-२०२४ मध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने हिंगणघाटजवळच्या जाम शहरात हे महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
जाम येथे कृषी विभागाची ४० एकर जमीन उपलब्ध आहे. या महाविद्यालयात एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाच्या १०० जागा राहणार असून रुग्णालयात ४३० खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
वर्धा येथे आधीच सुविधावर्धा शहरात आधीच जिल्हा रुग्णालय आहे. तसेच, शहराजवळच्या सेवाग्राम व सावंगी (मेघे) येथे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यरत आहे. त्यामुळे वर्धा येथे पुन्हा नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची गरज नाही, अशी भूमिका केंद्र व राज्य सरकारने उच्च न्यायालयासमक्ष मांडली. न्यायालयाला या मुद्द्यामध्ये तथ्य आढळून आले.