लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाची नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव भूषण गगरानी यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा होऊन ओबीसी समाजाच्या मागण्यांची लवकरच पूर्तता करण्याचे आश्वासन अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी शिष्टमंडळास दिले.राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मुंबई येथे झालेल्या तिसऱ्या वार्षिक अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असून ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार भंडारा-गोंदिया विधान परिषदेचे सदस्य आमदार डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून ओबीसी समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, प्रधान सचिव भूषण गगरानी यांनी ओबीसी शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. बैठकीत विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यात राज्यातील १९ जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह निर्माण करणे, ओबीसी शेतकऱ्यांना वनहक्क पट्ट्यांसाठी तीन पिढ्यांची लावलेली अट रद्द करणे, शासनाच्या सर्व खात्यात ओबीसी संवर्गातील रिक्त पदांचा अनुशेष भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आणून रिक्त जागा भरणे, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना संयुक्त भारतरत्न प्रदान करणे, महात्मा फुले यांच्या प्रकाशित पुस्तिकेला सबसिडी देणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत प्रवीण परदेशी यांनी १९ जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना शासकीय जागेचा शोध घेऊन त्यावर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले असून महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना संयुक्त भारतरत्न प्रदान करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे करण्यात आल्याची माहिती दिली. ओबीसी समाजाच्या महामंडळाला दोन वर्षात ५०० कोटींचा निधी देऊन लवकरच रिक्त पदांचा अनुशेष भरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी संघाच्या शिष्टमंडळात आमदार डॉ. परिणय फुके यांच्यासह राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राजकीय समन्वयक डॉ. खुशाल बोपचे, महासचिव सचिन राजुरकर, समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.