नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्वातंत्र्य समता, बंधुत्व व न्याय यावर आधारित लोकशाही अपेक्षित होती. भारतीय संविधानही या लोकशाही मूल्यांवरच आधारलेले असून बाबासाहेबांच्या संकल्पनेतील ही लोकशाही भारतासह जगभरातील देशात रुजावी, अशी अपेक्षा थायलंड व जपान येथील विचारवंतांनी दीक्षाभूमी येथे व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीतर्फे दीक्षाभूमीवर बुधवारी आंतरराष्ट्रीय धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती. स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई, सचिव सदानंद फुलझेले, भदंत अनेक, थायलंडचे लेफ्टनंट जनरल डॉ. मनीत, जपान येथील प्रा. सेकिनी यामुनामा, थायलंड येथील चालीसा टोक्रावेस, मॅलिवान लिंगोरसाकूल, अर्चा विटातानुवट, रुंगथीप छोटनापलाई, सुवरी थानुथम्मराठ, थावलपाट श्रिजारुपाट, पॅच्चोमॉन क्रिट्कामजॉर्न, हतियीरात खुनोपकॉर्न, सुमरी खुनोपकॉर्न, छाडछाडा पट्टरथिवात, रिनियापट सुराप्रयोगोछायी, अरुणवान एम्नामफॉन, पिटचरी प्रोमचॉय, तानाफॉप असंगसाँग, सम्बॉट बुटी, अतितीपाट चोंगवॉटटन्नामपिरोम दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, सुधीर फुलझेले, एन.आर. सुटे, कैलास वारके आदी व्यासपीठावर होते. थायलंडचे लेफ्टनंट जनरल डॉ. मनीत म्हणाले, गौतम बुद्धांमुळे भारताबद्दल बौद्ध राष्ट्रांना आदर आहेच. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे मात्र हे नाते आणखी अतूट झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे केवळ देशापूरतेच नव्हे तर जगालाही मार्गदर्शक ठरणारे आहेत. डॉ. रुंगथीप यांनीही डॉ. आंबेडकरांच्या कार्यावर प्रकाश टाकला. सदानंद फुलझेले आणि भदंत ससाई यांनी डॉ. आंबेडकर आणि बुद्धांच्या विचारांचा जगभरात प्रचार प्रसार करण्याचे आवाहन केले. एस.के. गजभिये यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)भदंत सुरई ससाई यांचा सत्कार याप्रसंगी भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई हे दीक्षाभूमी येथील पूरमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्याप्रीत्यर्थ थायलंड आणि जपानच्या शिष्टमंडळातर्फे त्यांना चीवरदान देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
बाबासाहेबांच्या संकल्पनेतील लोकशाही जगात रुजावी
By admin | Published: October 22, 2015 4:38 AM