लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १८ वर्षावरील तरुणांना मतदार होण्याचा अधिकार मिळाला आहे. परंतु या नवमतदार तरुणाला लोकशाही म्हणजे काय? स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय? राज्य सरकार कसे काम करते, याची कुठलीही माहिती नाही किंवा जाणीवही नाही. माहिती नसतानाही हे नवमतदार निवडणुकीत मतदान करतात. त्यांना या सर्वांबाबतची माहिती मिळाली, तर लोकशाही अधिक मजबूत होईल, या उदात्त उद्देशाने शासनाने पुढाकार घेऊन नवतरुणांना लोकशाहीची मूल्ये शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधात कामालाही सुरुवात केली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.यासंबंधात सहारिया यांनी गुरुवारी नागपुरात रविभवन येथे आढावा घेतला. या बैठकीत विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त वीरेंद्र सिंग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिद्धार्थविनायक काणे आदी उपस्थित होते. बैठकीनंतर सहारिया यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की, युवकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने शासनाने पुढाकार घेतला आहे. यासाठी निवडणूक आयोग, प्रशासन व विद्यापीठ मिळून कार्य करीत आहे. या संबंधात शासनाने गेल्यावर्षी एक परिपत्रकही काढले आहे. त्यात स्पष्ट करण्यात आले आहे की, प्रथम वर्षाला प्रवेश करताना विद्यार्थ्याकडून प्रवेश अर्जावरच एक संमतीपत्र विद्यापीठाने लिहून घ्यावे. त्यात मी १८ वर्षाचा झाल्याबरोबर मतदार यादीमध्ये आपले नाव नोंदवून घेईल, असे हमीपत्र विद्यार्थ्याला भरून द्यावे लगेल.प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला लोकशाही व स्थानिक स्वराज्य संस्था यांची माहिती व्हावी, जनजागृती व्हावी, यासंबंधात एक विषय अनिवार्य करण्यात यावा. तसेच प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याला स्थानिक स्वराज्य संस्थेला भेट देऊन तेथील प्रत्यक्ष कामकाज कसे चालते, हे पाहावयाचे आहे. यासंबंधात राज्यातील अनेक विद्यापीठाने कामाला सुरुवात केली असल्याचेही सहारिया यांनी सांगितले. नागपूर विद्यापीठातील कुलगुरुंनी आजच्या बैठकीत यासंबंधाने कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगितले.
तरुणांना शिकवणार लोकशाहीची मूल्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:34 AM
शासनाने पुढाकार घेऊन नवतरुणांना लोकशाहीची मूल्ये शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधात कामालाही सुरुवात केली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.
ठळक मुद्देमुख्य निवडणूक आयुक्त सहारिया शासनाचा पुढाकार