लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्यवस्थापनाच्या पक्षपाती धोरणाविरुद्ध बँक ऑफ इंडियाच्या संपूर्ण भारतातील कर्मचारी संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. या अंतर्गत शुक्रवारी बँकेच्या किंग्जवे रोड येथील मुख्य कार्यालयासमोर संघटनेचे अध्यक्ष एस. रेवतकर आणि महासचिव सुरेश बोभाटे यांच्या नेतृत्वात ४०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाच्या धोरणाविरुद्ध निदर्शने केली.सुरेभ बोभाटे म्हणाले, व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या एका घटकाशी अत्यंत उदार आहे तर दुसऱ्या घटकाशी पक्षपाती आहेत. हा बँकेच्या शीर्ष व्यवस्थापनाच्या विवेकबुद्धीचा गैरवापर आहे. व्यर्थ खर्च, प्रशासनात सुधारणा, तातडीची भरती आणि बँकेतील अनैतिक प्रवृत्तीच्या मुद्यांमुळे संघटनेला आंदोलनाचा मार्ग निवडण्यास प्रवृत्त केले आहे. मागण्यांचा व्यवस्थापनाकडे पाठपुरावा केला असता कोणताही परिणाम झालेला नाही.याप्रसंगी बोभाटे यांनी व्यवस्थापनाच्या पक्षपाती मानसिकतेचे धोरण उघड केले. कायदेशीर व तांत्रिक औपचारिकता पारित करून प्रासंगिक कामगारांना नोकरी देण्याच्या बाबतीत बँक ऑफ इंडियामध्ये अवलंबलेल्या अनैतिक पद्धतींवर भाष्य केले. बँकेत भ्रष्टाचाराची शक्यता असून तरुणांचे शोषण होत आहे. बँकेत लिपीक आणि उप-कर्मचारी भरती करण्याची तातडीची गरज यावरही त्यांनी जोर दिला. पुढे १३ डिसेंबरला एक दिवस, जानेवारीत दोन दिवस संप करण्यात येणार असून मागण्यांचे निराकरण न झाल्यास आणि बँकेत अवलंबलेल्या अनैतिक पद्धतींमध्ये काहीच सुधारणा न झाल्यास अनिश्चितकालीन संप करण्याचा इशारा त्यांनी दिला. रेवतकर म्हणाले, बँक स्वत:ला अप्रत्यक्ष भ्रष्टाचारामध्ये सामील करून मोठ्या जोखमीत आणत आहे.निदर्शनेदरम्यान सुनील बेलखोडे, अशोक शेंडे, नारायण उमरेडकर, दिलीप चौधरी, हर्ष अग्रवाल, वृषाली शेंदरे, प्रांजली चित्रियो, लता ठाकूर, युगल सेलोकर, पूजा रंगारी, मोहम्मद इम्तियाज, श्रीकृष्ण चेंडके, योगेश समुंदरे, मनीषा बुराडे, राऊत, अभ्यंकर, मनोज बेलसरे, स्वरूपा धाबर्डे आणि अनेक कर्मचारी उपस्थित होते.
नागपुरात बँक ऑफ इंडिया कर्मचाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 11:30 PM