नागपूर : कोरोना उपचाराचा काढा देणाऱ्या महिला आयुर्वेदिक डॉक्टरच्या विरुद्ध मनपाने कारवाई केल्याने, संतप्त झालेल्या कोरोना रुग्णांनी पाचपावली पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
बुद्धनगर येथे या महिला डॉक्टरचे क्लिनिक आहे. त्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांना काढा देत आहे. त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या काढ्याची परिसरात चर्चा असल्याने त्यांच्या क्लिनिकमध्ये चांगलीच गर्दी होते. दररोज मोठ्या संख्येने लोकं काढा घेण्यासाठी क्लिनिकबाहेर असतात. तो परिसर रहिवासी असल्याने लोकं काळजीत पडले होते. कोरोना रुग्णांची क्लिनिकमध्ये ये-जा असल्याने संक्रमणाचा धोका होऊ शकतो, अशी भीती परिसरातील लोकांना होती. पाचपावली पोलिसांनाही तक्रार देण्यात आल्याची माहिती आहे, पण पोलिसांनी दखल न घेतल्याने, लोकांनी त्या महिला डॉक्टराची तक्रार मनपाला केली. मनपाचे अधिकारी दुपारी क्लिनिकमध्ये पोहोचले, दवाखाना बंद करून निघून गेले. मनपाकडून केलेल्या कारवाईची माहिती काढा घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णापर्यंत पोहोचली. सर्व क्लिनिकजवळ एकत्र झाले.
या सर्वांना घेऊन महिला डॉक्टर पाचपावली पोलीस ठाण्यात पोहोचली. विनाकारण क्लिनिक बंद केल्याची तक्रार दाखल केली. तिच्यासोबत आलेले लोक मनपाने केलेल्या कारवाईच्या विरोधात नारेबाजी करू लागले. नारेबाजी करणाऱ्यांमध्ये काही कोरोना संक्रमित रुग्ण असल्याचे माहिती पडल्यावर पाचपावली पोलीस ठाण्यात भीतीचे वातावरण पसरले होते. काही वेळ नारेबाजी केल्यानंतर महिला डॉक्टर व लोक निघून गेले. महिला डॉक्टरचा दावा आहे की, तिच्या काढ्याने अनेक लोक बरे झाले आहेत.