लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : शहर व तालुक्यातील सामान्य नागरिकांच्या विविध समस्या साेडविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामठी तहसील कार्यालयासमाेर शुक्रवारी (दि. २९) दुपारी निदर्शने करीत राज्यातील आघाडी सरकारचा निषेध नाेंदविला. शिवाय, तहसीलदार अरविंद हिंगे यांच्याकडे मागण्यांचे निवेदन साेपविले.
लाभार्थ्यांना पंतप्रधान घरकूल आवास योजनेअंतर्गत घरांचे बांधकाम करण्यासाठी मालकी हक्काचे पट्टे देण्यात यावे. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान देण्यात यावे. पंतप्रधान घरकुल योजनेंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम निधी वितरित करावा. कामठी नगर परिषद क्षेत्रातील विविध प्रलंबित समस्या प्राधान्याने सोडविण्यात याव्या. अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेची अंमलबजावणी करून या याेजनेचा नागरिकांना लाभ द्यावा. अतिवृष्टीमुळे ज्यांचे नुकसान झाले, त्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी. पंतप्रधान घरकुल याेजनेंतर्गत ६८८ लाभार्थ्यांचा डीपीआर मंजूर करण्यात आला असून, काही लाभार्थ्यांना पट्टे वाटप केले आहे. परंतु, नगर परिषदद्वारे मोजक्याच लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी निधी दिला असून, अनेक लाभार्थी प्रतीक्षेत आहेत. काहींना पहिल्या तर काहींना दुसऱ्या टप्प्यात एक लाख रुपयांचे अनुदान दिले आहे. बहुतांश लाभार्थ्यांना अनुदान दिले नाही. त्यामुळे त्यांच्या घरकुलांचे बांधकाम रखडले आहे. ही समस्या साेडविण्यात यावी. प्रभात १४ मध्ये पंतप्रधान घरकुल योजनेसाठी प्लेन टेबल सर्व्हे करावा, अशी मागणीही या निवेदनाद्वारे केली आहे.
...
गुन्हे दाखल
निदर्शनादरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या विराेधात नारेबाजी केली. एवढेच नव्हे तर, तहसील कार्यालयाच्या इमारतीवर विनापरवानगी चढून झेंडा फडकावला. ही बाब बेकायदेशीर असल्याने नायब तहसीलदार रणजित दुसावार यांनी कामठी (नवीन) पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविली. त्यामुळे नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते लालसिंग सोनीलाल यादव (५०), उज्ज्वल रायबोले (४६), प्रतीक पडोळे (२९), रमेश वैद्य (४२), प्रतीक बोंबले (२९), अरविंद चवडे (४०) (सर्व रा. कामठी) यांच्या विराेधात भादंवि १४३, ४४८ १८८, मुंबई पाेलीस कायदा १३५ अन्वये गुन्हे नाेंदविण्यात आले.