लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देना बँकेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून आर्थिक गुन्हेगारी करणाऱ्या अनेक टोळ्यांनी बँकेला तब्बल ९४ कोटी रुपयांचा गंडा घातला. गेल्या तीन वर्षांत फसवणुकीची एकूण १९ प्रकरणे बँक अधिकाऱ्यांच्या नजरेत आली असून, त्यांनी यापैकी दोन प्रकरणांची तक्रार गुन्हे शाखेकडे नोंदवली. या दोन प्रकरणात साडेपाच कोटींची बनवाबनवी उघड झाल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.गृहकर्जाच्या नावाखाली बनवाबनवी करून देना बँकेला साडेतीन कोटींचा गंडा घालणाऱ्या ११ जणांच्या टोळीविरुद्ध गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला. सतीश बाबाराव वाघ (मोहननगर, सदर), प्रभाकर दौलतराव आमदरे (रा. कुचडी, तितूर), अशोक रामभाऊ शिंदे (रा. सावनेर), ललित रामचंद्र देशमुख (रा. वाठोडा ले-आऊट, गोपालकृष्णनगर), कुसुम मधुकर मानकर (रा. सावनेर), भरत बाबूराव राजे, गणेश बाबूराव राजे (रा. दोघेही सत्यसाई सोसायटी, दत्तवाडी), जयंत नानाजी देशमुख (रा. महाजनवाडी वानाडोंगरी, हिंगणा), जगदीश झनकलाल चौधरी (रा. गांधी चौक सदर, नागपूर), स्वप्निल भीमराव कौरती (रा. एलआयजी म्हाडा कॉलनी) आणि भोजराज दिनबाजी उकोणकर (रा. मांडवघोराड, हिंगणा) अशी या टोळीतील आरोपींची नावे आहेत.सतीश वाघ या टोळीचा मुख्य सूत्रधार असून, त्याने या बँकेला गंडा घालण्यासाठी आपल्या गैरकृत्यात बँक अधिकाऱ्यालाही लाभार्थी बनविले. त्यामुळे देना बँकेचा निवृत्त व्यवस्थापक आणि त्याच्या पत्नीलाही या प्रकरणात आरोपी केले जाणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांनी आज पत्रकारांना दिली.उपायुक्त कदम यांच्या माहितीनुसार, आरोपी सतीश वाघ आणि अन्य आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहेत. त्यांनी एका भूखंडाचे दोन भाग करून त्यावर गृहकर्जासाठी देना बँकेच्या सिव्हिल लाईन शाखेत २९ आॅक्टोबर २०१५ ते २२ आॅगस्ट २०१६ या कालावधीत प्रकरण सादर केले. तत्कालीन बँक अधिकाऱ्याने फारशी चौकशी न करता या आरोपींना १८ नोव्हेंबर २०१५ ते ७ मार्च २०१६ या कालावधीत २ कोटी ४ लाखाचे कर्ज मंजूर करून तो डीडी या टोळीचा सूत्रधार सतीश वाघ याला दिला. पुढे १० जून २०१६ पर्यंत कर्जदारांना बांधकामासाठी ४१ लाख, १५ हजार रुपये देण्यात आले. दरम्यान, या शाखेत नवीन बँक व्यवस्थापक आले. आरोपींनी कर्जाचे एक दोन हप्ते भरल्यानंतर बँकेकडे फिरकणे बंद केले. त्यामुळे कर्जाची रक्कम व्याजासह ३ कोटी ४६ लाख ५५ हजारांवर पोहचली. ते पाहून नवीन व्यवस्थापकांनी आरोपींनी दिलेल्या पत्त्यावर भेट दिली तेव्हा त्या भूखंडावर कोणतेही बांधकाम करण्यात आले नसल्याचे उघडकीस आले.ही फसवणूक उजेडात आल्यानंतर बँकेतर्फे निर्मलचंद्र मारोतराव पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे शाखेने चौकशी सुरू केली. विशेष म्हणजे, आरोपींनी ज्या भूखंडाची किंमत २०१५ मध्ये २ कोटी १९ लाख ५९ हजार एवढी दाखवली होती तो भूखंड बाजारभावाप्रमाणे केवळ २७ लाख ९० हजार रुपयांचा असल्याचे फेरमूल्यांकनातून स्पष्ट झाले. सरकारी मूल्यांकनानुसार त्याची किंमत ६० लाख २४ हजार होती. अर्थात आरोपींनी मुद्दामहून या भूखंडाची किंमत जास्त दाखवून बँकेची हेतुपुरस्सर दिशाभूल केल्याचेही तपासात उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी उपरोक्त टोळीतील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे उपायुक्त कदम यांनी सांगितले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे उपस्थित होते.बँक अधिकाऱ्याची अर्थपूर्ण डोळेझाकविशेष म्हणजे, तब्बल २ कोटी १९ लाखांचे कर्ज देणाऱ्या बँक अधिकाऱ्यांनी मुद्दामहूनच डोळेझाकपणा केला. त्याबदल्यात तत्कालीन बँक अधिकारी शिरीश ढोलकेला १४ लाख ५० हजार रुपये मिळाले. यातील ५० हजार रुपये अधिकाऱ्यांच्या पत्नीच्या खात्यात जमा झाल्याची नोंद आहे. उपरोक्त टोळीतील आरोपी अशोक शिंदेकर (रा. सावनेर) याला गुन्हेशाखेने अटक केली. त्याच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे. सहायक निरीक्षक प्रशांत जुमडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
दुसरे प्रकरण बनावट कंपनीचे आहे.आरोपी दिलीप मोरेश्वर कलेले (रा. नॉर्थ अंबाझरी, वर्मा लेआऊट) याने त्याचा भाचा समीर चट्टे याच्यासोबत संगनमत करून देना बँकेच्या धरमपेठ शाखेत खुर्ची टेबल ट्रेडिंग कंपनीसाठी दोन कोटींचे कर्ज (कॅश क्रेडिट) घेतले. ही रक्कम वापरल्यानंतर कर्जाचे हप्ते भरण्याची तसदी मात्र घेतली नाही. कर्ज थकल्यामुळे बँंकेचे व्यवस्थापक मोहम्मद शफी हैदर यांनी प्रकरणाची चौकशी केली असता आरोपी दिलीप कलेले, अरुण नागभीडकर, त्याची पत्नी अरुणा नागभीडकर, समीर चट्टे आणि मेहुल धुवाविया या चौघांनी माँ अनसूया ट्रेडिंग कंपनी, अरेना इंडस्ट्रीज, माँ तुळजाभवानी इंडस्ट्रीज आणि आदिनाथ इंडस्ट्रीज नावाने बनावट कंपन्या सुरू केल्या. या कंपन्यांच्या खात्यातून कॅश क्रेडिटची रक्कम फिरवून महाठग समीर चट्टे याने ती रक्कम साथीदारांसह वाटून खाल्ली. विशेष म्हणजे, आरोपींना वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावे आर्थिक व्यवहाराची बनावट नोंद करून बँकेची फसवणूक करण्यासाठी चार्टर्ड अकाऊंटंट एस. एम. कोठावाला अॅन्ड असोसिएटस् या कंपनीने महत्त्वाची भूमिका वठविली. पहिल्या वर्षी अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांची उलाढाल ६ कोटी ५० लाख तर दुसऱ्या वर्षी १० कोटी रुपये दाखविण्यात आली. देना बँंकेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापकानेही सहकार्य केले. गुन्हे शाखेकडे हे प्रकरण आल्यानंतर सहायक निरीक्षक प्रमोद घोंगे यांनी तपास करून उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.