लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यभरात डेंग्यू, हिवताप, चिकुनगुनियासह इतर कीटकजन्य आजारांची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. मागील तीन वर्षांमध्ये डेंग्यूमुळे राज्यातभरात १६४ रुग्णांचा तर हिवतापाने ५९ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले. विशेष म्हणजे, डेंग्यू व हिवतापाचे रुग्णांत घट होत असतानाही मृत्यूची आकडेवारी धक्कादायक असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे.प्राप्त माहितीनुसार, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१६ या वर्षभरात २३ हजार ९८३ जणांना हिवतापाची लागण झाली तर २६ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. २०१७ मध्ये १७ हजार ७१० जणांना लागण, तर २० रुग्णांचा मृत्यू झाला. २०१८ मध्ये १० हजार ७५७ जणांना लागण, तर १३ रुग्णांचा मृत्यू झाला. अशा तीन वर्षांत एकूण ५२ हजार ४५० जणांना लागण तर ५९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद सहसंचालक आरोग्य सेवा पुणे कार्यालयात आहे.हिवतापापेक्षा डेंग्यूची मोठी दहशत आहे. २०१६ मध्ये ६ हजार ७९२ जणांना डेंग्यूची लागण झाली. ३३ रुग्णांचा मृत्यू झाला. २०१७ मध्ये ७ हजार ८२९ जणांना लागण, तर ६५ रुग्णांचा मृत्यू झाला. २०१८ मध्ये ११ हजार ३८ जणांना लागण, तर ६६ रुग्णांचा मृत्यू झाला. तीन वर्षात एकूण २५ हजार ६५९ जणांना लागण, तर १६४ रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला.चिकुनगुनियाचे तीन वर्षात पाच हजारावर रुग्ण२०१६ मध्ये चिकुनगुनियाची २९४९ जणांना लागण झाली. २०१७ मध्ये १४३८ जणांना, तर २०१८ मध्ये १०२६ जणांना लागण झाली. तीन वर्षांत चिकुनगुनियाची एकूण ५ हजार ४१३ जणांना लागण झाली. मात्र, या आजाराने एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही.हत्तीपाय रोगाचे ४३१ रुग्ण२०१६ मध्ये हत्तीपाय रोगाची १२६ जणांना लागण, २०१७ मध्ये १४४ जणांना, तर २०१८ मध्ये १६१ जणांना लागण झाली. एकूण तीन वर्षांमध्ये ४३१ जणांना लागण झाली आहे. मात्र, या आजाराने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची नोंद पुणेच्या आरोग्य विभागाकडे आहे. ही सर्व माहिती नागपूरचे माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी विचारलेल्या माहितीच्या अधिकारात मिळाली आहे.गेल्या वर्षी चंडिपुराचे सहा रुग्ण२०१६ व २०१७ मध्ये चंडिपुराचे शून्य रुग्ण होते. २०१८ मध्ये मात्र या आजाराचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. इन्सेफ्लाइटिस रोगाचे (मेंदू ज्वर) २०१६ मध्ये २० रुग्ण आढळले, तर एकाचा मृत्यू झाला आहे. २०१७ मध्ये एक रुग्ण आढळला आणि एक मृत्यू. २०१८ मध्ये ४८ रुग्ण आढळले, तर १ मृत्यू आहे.जपानी मेंदू ज्वराचे २०१६ मध्ये १२ रुग्णांना लागण, तर एक मृत्यू आहे. २०१७ मध्ये २९ जणांना लागण, मृत्यू शून्य आहे. तर २०१८ मध्ये सहा जणांना लागण, तर एक मृत्यू झाल्याची नोंद आहे. काला आजार व प्लेगचे मागील तीन वर्षांत एकाही व्यक्तीला लागण वा मृत्यूची नोंद नाही.