भिवापूर : कोरोनानंतर आता डेंग्यूने भिवापूर तालुक्यात तोंडवर काढले आहे. सरकारी व खासगी दवाखाण्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या एक दोन नव्हे तर पन्नासावर असल्याचे चित्र आहे. असे असताना शहरात नगरपंचायत, तर ग्रामीण भागात ग्रामपंचायत प्रशासन मात्र मूकबधिर आहे. डेंग्यूच्या या उद्रेकामुळे सरकारी व खासगी दवाखानेही फुल्ल आहे. काहींना नागपूरला हलविण्यात आले आहे.
गत महिनाभरापासून डेंग्यूमुळे शहर व तालुक्यातील वातावरण भयभीत आहे. चिमुकल्यांना सुद्धा डेंग्यूने डंख मारला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. गत १८ ते २८ जुलैपर्यंत ग्रामीण रुग्णालयात डेंग्यूचे तब्बल १४ रुग्ण दाखल झाले. यातील काहींना नागपूरला हलविण्यात आले. खासगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांचा आकडा मोठा आहे. शहरात पाच ते सहा खासगी दवाखाने असून, प्रत्येक दवाखान्यात दररोज पन्नासावर रुग्णांच्या नोंदी होतात. यातील काही रुग्ण व्हायरल फिव्हर तर काही रुग्ण डेंग्यूचे असल्याचे निष्पन्न होत आहे. रुग्णांच्या उपचारात ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत आहे. याप्रकारामुळेच ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या डेंग्यूच्या एका गंभीर रुग्णाला बुधवारी रात्री (दि.२८) नागपूरला हलविण्यात आले. मात्र त्यानंतरही आरोग्य यंत्रणा व नगरपंचायत प्रशासन गंभीर असल्याचे दिसत नाही.
---
स्वच्छतेचे वाजले बारा
शहरात स्वच्छतेचे बारा वाजले आहे. नागरिकांनी घरातील अंतर्गत स्वच्छता बाळगण्याचे आवाहन नगरपंचायत प्रशासन करत असले तरी बाह्य स्वच्छतेकडे मात्र नगरपंचायतीचे पूर्णता दुर्लक्ष आहे. शहरभरात लावलेल्या कचरा पेट्या घाणीने बरबटल्या आहे. काहीभागात नाल्या सुद्धा तुडुंब भरल्या आहे. ऐन पावसाळ्यात रामधन चौक परिसरातील नाल्यांचे खोदकाम करण्याचा उपद्व्याप नगरपंचायतीने केला आहे. त्यामुळे मच्छरांना पुन्हा मोकाट मैदान मिळाले आहे.
---
धुरळणी कुठाय?
शहरात डेंग्यूचे रुग्ण दिवसागणिक वाढत असताना फॉगिंग मशीनने धुरळणी होताना दिसत नाही. याबाबत नगरपंचायत प्रशासनाला विचारणा केली असता धूरळणी सुरू असल्याचे सांगितले. दुसरीकडे धूरळणी करतानाचे चित्र शहरवासीयांना अद्यापही दिसले नाही. त्यामुळे धूरळणी कुठाय, असा प्रश्न विचारल्या जात आहे. तालुक्यातील गावखेड्यातही हीच अवस्था आहे. पावसाळ्यात संसर्गजन्य आजार बळावण्याची अधिक शक्यता असता ग्रामपंचायत प्रशासन सुस्त आहे.
---
मालेवाडा, गोंडबोरी आणि चिखलीतही रुग्ण
शहरासह ग्रामीण भागातही डेंग्यूचे रुग्ण वाढल्याचे चित्र आहे. ग्रामीण रुग्णालयातील नोंदीनुसार मालेवाडा, चिखली आणि गोंडबोरी, जवळी येथे डेंग्यूचे रुग्ण आढळले आहे. तालुक्यातील काही गावांना आरोग्य सुविधेच्या दृष्टीने उमरेड शहराजवळ आहे. त्यामुळे अनेक रुग्ण उमरेड येथील शासकीय व खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. या तीन गावांसह इतरही गावात रुग्ण असल्याचे कळते.
--------
शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक आहे. स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष देऊन फॉगिंग मशीनद्वारे शहरभर तत्काळ धूरळणी करण्यात यावी. अनेक ठिकाणच्या नाल्या अद्यापही स्वच्छ झालेल्या नाही.
- प्रमोद रघुशे, भिवापूर
----