नागपूर : मेडिकल नर्सिंग कॉलेजचा एका विद्यार्थिनीचा ‘गॅस्ट्रोएन्ट्रायटिस’मुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असताना आता डेंग्यूने चिंता वाढवली आहे. नर्सिंगची एक विद्यार्थिनी ‘आयसीयू’मध्ये उपचार घेत आहे. विशेष म्हणजे, मेडिकलच्या परिसरात असलेल्या डेंटल कॉलेजचा एक विद्यार्थीही डेंग्यूमुळे भरती आहे.
डेंग्यूवर स्पष्ट उपचार नाही. अॅण्टीबायोटिक किंवा अॅण्टीव्हायरल औषधही नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. नागपूर जिल्ह्यात पावसाने जोर धरला नसलातरी जागोजागी पावसाचे पाणी साचून आहे. लोकांच्या घरातील कुलर अद्यापही सुरू आहे. परिणामी, डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे.
डेंग्यू रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मेडिकलच्या परिसरात असलेले पाण्याचे डबके, किटकनाशक फवारणीचा अभाव, विशेषत: निवासी डॉक्टरांचे मार्ड वसतिगृह, नर्सिंग कॉलेजचे वसितगृह व दंत महाविद्यालयाचा वसतिगृहाच्या परिसरात वाढलेले झाडीझुडूप, साचून राहत असलेले पाणी व अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी आहेत. सध्या मागील दोन दिवसांपासून नर्सिंग कॉलेजची एक विद्यार्थिनी तर डेन्टल कॉलेजचा एक विद्यार्थ्याला डेंग्यू असल्याचे निदान झाले. या दोन्ही विद्यार्थ्यावर मेडिकलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.