नागपूर : डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद होण्यासाठी आरोग्य विभाग दर दोन महिन्यांतून एकदा ‘डेट ऑडिट’ करून, त्यानंतर मृत्यूची नोंद करते. विशेष म्हणजे, मागील महिन्यापासून जिल्ह्यात दर आठवड्याला सुमारे एका रुग्णाचा मृत्यू होत असताना व हॉस्पिटलच्या ‘डेथ समरी’मध्ये तसा स्पष्ट उल्लेख होत असताना, डेंग्यूचा मृत्यूची नोंद होण्यास विलंब का, मृत्यूची ही लपवालपवी तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पावसाची उघडझापमुळे डासांसाठी पोषक झालेले वातावरण, घराघरातील बंद न झालेले कुलर, जागोजागी साचत असलेले पाणी, फवारणीसाठी कमी पडत असलेले मनुष्यबळ आदींमुळे डेंग्यू डासांचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान नागपूर शहरात ६१७ रुग्ण तर ग्रामीणमध्ये ७९० असे एकूण १,४०७ रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्या वाढत असताना मृत्यूची संख्या शहरात ३ तर ग्रामीणमध्ये ३ वर गेलेली नाही. जानेवारी ते जुलै महिन्यात झालेल्या डेंग्यू मृत्यूचे ‘डेथ ऑडिट’ ऑगस्ट महिन्यात झाले. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे ‘डेथ ऑडिट’ नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. मृत्यूवर निर्णय घेण्यास लागणाऱ्या या विलंबामागे शासनाची भूमिकेवरच आता संशय व्यक्त केला जात आहे.
-कोरोनाचे डेथ ऑडिट होत नाही डेंग्यूचेच का?
सध्या शासकीयसह खासगी रुग्णालयात सर्वाधिक रुग्ण डेंग्यूचे आहेत. उपलब्ध माहितीनुसार, मेयोमध्ये जानेवारी ते ऑगस्ट या दरम्यान ११ तर मेडिकलमध्ये ५ रुग्णांचे मृत्यू झाले, परंतु शासनदरबारी त्याची नोंद होण्यासाठी दोन महिन्यांवर वेळ लागतो. यामुळे डेंग्यूची भयानकता समोर येत नाही. याउलट कोरोना मृत्यूची ‘डेथ ऑडिट’ होत नाही. मृत्यू वाढताच त्या भागात आवश्यक उपाययोजना केल्या जातात. यामुळे आजार नियंत्रणात राहतो.