आदेशानंतरही कारवाई नाही : कचरा व पाणी साचून असलेल्या भूखंडधारकांना अभय
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील मोकळ्या भूखंडधारकांवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. महिना झाला तरी झोन अधिकाऱ्यांनी कोणत्याही स्वरूपाची कारवाई केलेली नाही. प्रशासनाकडूनच अभय असल्याने असे भूखंड डेंग्यूचे हॉटस्पॉट बनले आहेत.
डेंग्यूमुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत. दुसरीकडे शहरालगतच्या भागातील मोकळ्या भूखंडावर कचरा व पाणी साचून असल्याने डेंग्यूचे हॉटस्पॉट ठरले आहेत. मनपातर्फे सुरू असलेल्या सर्वेक्षणातही ही बाब स्पष्ट झाले आहे.
मोकळ्या भूखंडधारकांचा शोध घेऊन पाणी वा कचरा साचून असल्यास संबंधित भूखंडधारकांवर कारवाई करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाने दिले होते. मात्र झोन स्तरावरील अधिकारी याबाबत गंभीर नसल्याने लोकांच्या आरोग्याला धोका कायम आहे.
शहराच्या विविध भागात लोकांनी भविष्याची गुंतवणूक म्हणून प्लॉट खरेदी केले आहेत. मात्र यातील अनेक प्लॉटवर पाणी व कचरा साचून आहे. स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेल्या भरतवाडा, पुनापूर, पारडी, भांडेवाडी या भागासह वाठोडा, हुडकेश्वर, नरसाळा, दिघोरी, बेसा, काटोल रोड, नारा,नारी, झिंगाबाई टाकळी, गोरेवाडा यासह शहराच्या अन्य भागात मोठ्या प्रमाणात खाली भूखंड आहेत.
गेल्या काही दिवसात पावसाने जोर धरला आहे. मोकळ्या भूखंडावर पावसाचे पाणी साचले आहे. त्यात देखभाल नसल्याने गवत व झुडपे वाढली आहेत. यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. औपचारकिता म्हणून काही भूखंडधारकांना झोन कार्यालयांनी नोटीस बजावल्या आहेत. मात्र अद्याप कोणत्याही स्वरूपाची ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
...
४५ हजार भूखंडधारकांचा ठावठिकाणा नाही
शहरातील ४५ हजाराहून अधिक मोकळ्या भूखंडधारकांचा ठावठिकाणा नाही. यातील बहुसंख्य भूखंडावर कर आकारला जात नाही. अशा भूखंडधारकांचा शोध घेणे झोन कार्यालयांनाही शक्य नाही. याचा विचार करता जाहीर नोटीस काढून अशा भूखंडधारकावर कारवाई होण्याची गरज आहे.