नागपूर : घरोघरी लागलेले कूलर डेंग्यूचे हॉटस्पॉट ठरत असल्याचे महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. पथकाद्वारे १ हजार ९५९ घरांमधील कूलर्सची तपासणी करण्यात आली. त्यात २०३ कूलर्समध्ये डेंग्यूची अळी आढळून आली. डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांनी घरातील कूलर कोरडे करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण सुरू आहे. शनिवारी शहरातील ६ हजार ४९७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात २८२ घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. १२३ जणांच्या रक्ताचे नमुने तर २० जणांचे रक्तजल नमुने घेण्यात आले आहेत. सर्वेक्षणादरम्यान कूलर हे डेंग्यूचे हॉटस्पॉट ठरत असल्याचे दिसून आले. मनपाच्या चमूद्वारे १६३ कूलर्स रिकामे करण्यात आले. ७३४ कूलर्समध्ये १ टक्का टेमिफॉस सोल्यूशन तर ९१५ कूलर्समध्ये २ टक्के डिफ्लूबेंझ्युरोम गोळ्या टाकण्यात आल्या. तसेच १८९ कूलर्समध्ये गप्पी मासे टाकण्यात आले. पावसामुळे डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी डासांपासून संरक्षण करता येईल याची काळजी घ्यावी.
ही काळजी घ्या
- डासोत्पत्ती होणार नाही याचीही प्रत्येकाने विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
- घरातील कुंड्या, कूलरची टाकी, भांडी व जिथे पाणी साचू शकते अशा ठिकाणी पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
- ताप, उलट्या, सांधेदुखी, त्वचेवर पुरळ ही व अशी अन्य डेंग्यूसदृश लक्षणे दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत.