१३३७९७ घरांचे सर्वेक्षण : कुलर्समुळे डेंग्यू अळ्यांचा धोका वाढला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात महापालिकेद्वारे झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू आहे. १६ जुलै ते १२ ऑगस्ट या दरम्यान १,३३७९७ घरांचा सर्व्हे करण्यात आला. ७४४६ घरांमध्ये डेंग्यू अळ्या आढळून आल्या.
दि. १६ ते ३१ जुलैदरम्यान स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार ९८००६ घरांपैकी ५९२९ घरात डासअळी आढळून आली; तर १ ते १२ ऑगस्टदरम्यान ३५७९१ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. १५१७ घरांत डासअळी आढळून आली. ४५५१८ घरांतील कुलर्सची तपासणी केली. ५९६२ कुलर्समध्ये अळ्या आढळून आल्या. सर्व्हेदरम्यान तापाचे १६६८ रुग्ण आढळून आले.
महापालिकेच्या पथकाद्वारे शहरातील दहाही झोनमध्ये घरांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. घरांची तपासणी केली जात आहे. डासअळी आढळून आलेल्या ठिकाणी डेंग्यूसंदर्भात आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
दरम्यान, गुरुवारी झोननिहाय पथकाद्वारे ९२६६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यांपैकी ३६५ घरांमध्ये डेंग्यू अळी आढळून आली. याशिवाय १०२ ताप असलेले रुग्ण आढळून आले. १९३ जणांच्या रक्ताचे नमुने, तर २१ जणांचे रक्तजल नमुने घेण्यात आले आहेत. सर्वेक्षणादरम्यान १८०४ घरांमधील कुलर्सची तपासणी करण्यात आली. त्यात १५० कुलर्समध्ये डासअळ्या आढळून आल्या.
...
१६ जुलै ते १२ ऑगस्ट सर्वेक्षण
घरांचे सर्वेक्षण-१३३७९७
कुलर्सची तपासणी- ४५५१८
कुलर्समध्ये आढळली डास अळी-५९८२
आढळलेले तापाचे रुग्ण -१६६८