लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेने डेंग्यू, मलेरिया संदर्भात तयार केलेल्या नियमावलीला राज्य शासनाकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. असे असतानाही महापालिकेचे आरोग्य सभापती मनोज चाफले यांनी ज्या घरांमध्ये लारवी आढळली, त्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. या निर्देशांची अंमलबजावणी कशी करावी, असा प्रश्न आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पडला आहे.शहरात डेंग्यूचा प्रकोप वाढला आहे. याचा विचार करता महापौर नंदा जिचकार यांनी गुुरुवारी आरोग्य विभागाची बैठक घेतली. यात डेंग्यूला आळा घालण्याचे निर्देश दिले. या बैठकीला मनोज चाफले उपस्थित होते. त्यानंतरही त्यांनी शुक्रवारी पुन्हा आरोग्य समितीची बैठक घेऊ न फौजदारी कारवाईचे निर्देश दिले. यातून पदाधिका ऱ्यांत समन्वय नसल्याचे दिसून येते.डेंग्यूला आळा घालण्यासाठी राहत्या घरी व परिसरात स्वच्छता राखणे आवश्यक आहे. याशिवाय शाळांमधूनही जनजागृती होणे आवश्यक आहे. डेंग्यूची अळी (लारवी) पाण्यात वाढते. त्यामुळे घराजवळ अथवा परिसरात कुठेही पाणी साचून राहू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. असे आवाहन करतानाच तपासणी पथकातर्फे करण्यात आलेल्या तपासणीमध्ये ज्यांच्या घरी अथवा कार्यालय परिसरांमध्ये लारवी आढळेल त्यांच्यावर फौजदारी व दंडात्मक कारवाई करून त्यांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात यावीत, असे निर्देश चाफले यांनी दिले.बैठकीला समितीचे उपसभापती विजय चुटेले, सदस्य लखन येरवार, विशाखा बांते, गार्गी चोपरा, दिनेश यादव, वंदना चांदेकर, अपर आयुक्त अझीझ शेख, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. अनिल चिव्हाणे, डॉ. विजय जोशी, हत्तीरोग नियंत्रण अधिकारी जयश्री थोटे, कनक रिसोर्सेसचे कमलेश शर्मा यांच्यासह दहाही झोनचे आरोग्य विभागाचे झोनल अधिकारी उपस्थित होते.इंदूरच्या धर्तीवर काम करास्वच्छतेमध्ये इंदूर अव्वल क्रमांकावर आहे. इंदूरच्या धर्तीवर नागपूर स्वच्छ करायचे असेल तर इंदूरप्रमाणे स्वच्छतेचे नियोजन करणे व योग्य कारवाई करणे आवश्यक असल्याने यावर चर्चा करण्यात आली. गणेश विसर्जनादरम्यान झोननिहाय कृत्रिम तलाव, टँकचा आढावा घेतला. गणेशोत्सवादरम्यान विसर्जनस्थळी स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याची सूचना बैठकीत करण्यात आली.
डेंग्यू : शासन मंजुरी नसतानाही सभापतींचे फौजदारी कारवाईचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 11:17 PM
महापालिकेने डेंग्यू, मलेरिया संदर्भात तयार केलेल्या नियमावलीला राज्य शासनाकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. असे असतानाही महापालिकेचे आरोग्य सभापती मनोज चाफले यांनी ज्या घरांमध्ये लारवी आढळली, त्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. या निर्देशांची अंमलबजावणी कशी करावी, असा प्रश्न आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पडला आहे.
ठळक मुद्देसमन्वयाचा अभाव : शहरातील डेंग्यूला आळा कसा बसणार?