नागपूर : नागपूर शहर आणि जिल्ह्यात डेंग्यूचा प्रकोप सातत्याने वाढतो आहे. शनिवारी कामठी तालुक्यातील येरखेडा येथील डेंग्यू आजाराने ग्रस्त सतीश पाटील (३४) या युवकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
नागपूर शहरालगत असलेल्या कामठीत जुलै महिन्यात डेंग्यूचे ४ रुग्ण आढळल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली. ऑगस्ट महिन्यात यात अधिक भर पडली. मिळालेल्या माहितीनुसार सतीशची शुक्रवारी प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला कामठी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी त्याला नागपूर येथे रेफर केले. नागपुरातील खासगी रुग्णालयात शनिवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. सतीश हा केबल चे काम करायचा. तो अविवाहित होता.
दरम्यान, नागपूर शहरातही जुलै महिन्यापर्यंत डेंग्यू संशयित रुग्णांची संख्या ५६६ असताना मागील १५ दिवसांत १,२४५ संशयितांची भर पडली. सध्या १,८०१ रुग्ण आहेत. या रुग्णांची लक्षणे डेंग्यूसारखीच असल्याने घराघरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.