मागणीत वाढ : डॉक्टर देत आहेत पपई खाण्याचा सल्लानागपूर : राज्यात डेंग्यूने धुमाकूळ घातलेला आहे. शहरात आतापर्यंत २५८ तर नागपूर विभागात १५५४ जणांना डेंग्यू झाला आहे. मृत्यूची संख्याही वाढत आहे. शासकीय रुग्णालयांसह खासगी इस्पितळे या रोगाच्या रुग्णांनी फुल्ल आहेत. या रोगात रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट झपाट्याने कमी होतात. नियमित औषधोपचाराबरोबरच डॉक्टर पपई खाण्याचा सल्ला देत आहेत. यामुळे पपईची अचानक मागणी वाढली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत डेंग्यू व मलेरिया या दोन्ही रुग्णांची संख्या वाढत आहे. या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी महानगरपालिकेचे व आरोग्य विभागाचे प्रयत्न तोकडे पडत आहे. विशेष म्हणजे, मनपाच्या फवारणीत डेंग्यू डासांच्या अळ्या मरतच नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली, असे असतानाही मनपा याकडे दुर्लक्ष करीत आहे. दुसरीकडे या रोगांमुळे रक्तातील प्लेटलेट कमी होत असल्याने प्लेटलेट्सच्या मागणीत वाढ झाली आहे. रोज येते एक ट्रक पपईफळ व्यापारी किशोर बोंधाडे म्हणाले, तीन-चार महिन्यांपूर्वी नागपुरातील फळ मार्केटमध्ये पपईचे दहा ते पंधरा ट्रक यायचे. आंध्र प्रदेशापासून ते नांदेडवरून पपई यायची. परंतु मागणीत वाढ झाल्याने आता फक्त एकच ट्रक पपई येत आहे. हा ट्रक नांदेडवरून येत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने पपईच्या किमती वाढल्या आहेत. पूर्वी घाऊक विक्रेत्याकडे प्रति किलो ८ ते १० रुपयांत येणारी पपई आता १५ ते २० रुपयांत मिळत आहे. यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी आपला भाव वाढवून ३० ते ४० रुपये प्रतिकिलो केला आहे. (प्रतिनिधी)
डेंग्यूवर पपईचा उतारा!
By admin | Published: November 10, 2014 1:05 AM