मांढळ : नजीकच्या पारडी गावात डेंग्यूचा रुग्ण आढळून आला. एका १० वर्षीय बालकास डेंग्यूची लागण झाली असून, त्याला कुही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पारडी येथील ऋषी गेडेकर यांचा भाचा दाेन महिन्यापासून पाहुणा आला आहे. रविवारी (दि.४) रात्रीच्या सुमारास बालकाची प्रकृती बिघडल्याने त्याला मांढळ येथील खासगी दवाखान्यात नेले. तिथे डाॅक्टरांनी डेंग्यूचे निदान केल्यानंतर त्याला मांढळ प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल करण्यात आले. आराेग्य केंद्रातील डाॅक्टरांनी त्याला कुही ग्रामीण रुग्णालयात हलविले. बालकावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, पारडी ग्रामपंचायतचे उपसरपंच नरेश शुक्ला यांनी मांढळ आराेग्य केंद्राला माहिती दिली. आराेग्य कर्मचारी चंद्रकांत जंजाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पारडी येथे सांडपाण्याच्या नाल्यात जंतनाशक औषधाची फवारणी केली. ऋषी गेडेकर यांच्या घरालगतचा परिसर निर्जंतुक केला. पाणी साचलेली भांडी, डबक्याची स्वच्छता करीत स्वच्छतेबाबत नागरिकांनी दक्ष राहावे, असे आवाहन आराेग्य कर्मचाऱ्यांनी केले.