लाेकमत न्यूज नेटवर्क
काेंढाळी : काेंढाळी (ता. काटाेल) येथे १० दिवसांत डेंग्यूचे दाेन रुग्ण आढळून आले असून, रुग्णात वाढ हाेण्याची दाट शक्यता आहे. गावातील तुंबलेल्या नाल्या, साफसफाई व स्वच्छतेचा अभाव, त्यावर डुकरांचा मुक्तसंचार या अनुकूल वातावरणामुळे डासांची माेठ्या प्रमाणात पैदास हाेत असून, ते डास डेंग्यूच्या प्रसाराला कारणीभूत ठरत आहेत.
नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर असलेले काेंढाळी हे काटाेल तालुक्यातील माेठे व महत्त्वाचे गाव असून, या गावाची लाेकसंख्या ही २० हजाराच्या वर आहे. मागील काही वर्षापासून स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने गावाची साफसफाई व स्वच्छतेकडे मुळीच लक्ष नाही. गावात सांडपाण्याच्या भूमिगत नाल्यांचे बांधकाम सुरू असून, त्या कामाचा दर्जाही सुमार आहे. जुन्या नाल्यांची कित्येक दिवसापासून साफसफाई करण्यात न आल्याने त्या पूर्णपणे बुजल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी तुंबलेल्या नाल्या तर काही ठिकाणी राेडवरून वाहणारे सांडपाणी व डबके नजरेत पडते. या घाणीवर डुकरांचा मुक्तसंचार सुरू आहे.
दरम्यान, गावातील हेटी परिसरात डेंग्यूचे दाेन रुग्ण आढळून आले आहेत. गावात बहुतांश घरांमध्ये ताप व मलेरियाचे रुग्ण आढळून येत असून, याला वैद्यकीय सूत्रांनी दुजाेरा दिला आहे. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन यावर काहीही उपाययाेजना करायला तयार नाही.
...
प्रतिबंधक औषधांची धुरळणी कधी?
गावात डेंग्यू, मलेरिया, ताप व कीटकजन्य आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ हाेत आहे. आधीच काेराेना संक्रमण, त्यात डेंग्यूची भर पडत आहे. मात्र, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांचे आराेग्य जपण्याच्या दृष्टीने काहीही उपाययाेजना करायला तयार नाही. त्यामुळे गावातील नाल्यांची साफसफाई करणे, घाण व कचऱ्याची याेग्य विल्हेवाट लावणे, डुकरांचा बंदाेबस्त करणे व गावात डास प्रतिबंधक औषधांची धुरळणी करणे ही कामे करणार कधी, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
...
उघडी नालीत डुकरांचा आश्रय
काेंढाळी येथील विकासनगरात अजमत भाई व गिरीश धोंडे यांच्या घराजवळ मोठी नाली असून, ती उघडी आहे. साफसफाईअभावी ती नाली बुजली असून, त्यात डुकरांनी आश्रय घेतला आहे. त्यामुळे या भागात डुकरांची संख्याही वाढली आहे. ही डुकरं नालीतील घाण परिसरात पसरवतात. आधीच घाण, त्यात डुकरांचा वावर यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामपंचायत प्रशासन साफसफाईसाेबतच त्या डुकरांचा बंदाेबस्तही करायला तयार नाही.