सावनेर : पावसाळा असल्याने ग्रामीण भागात संसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. या महिन्यात सावनेर तालुक्यात डेंग्यूचे पाच रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्येत वाढ होऊ नये यासाठी सावनेर नगर परिषद आणि तालुक्यातील ग्रामपंचायतींनी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे सुरू केले आहे. तालुक्यातील उमरी, नंदापूर, खापा, नरसाळा आणि सावनेर शहरातील प्रोफेसर कॉलनीत डेंग्यूच्या रुग्णाची नोंद झाली आहे. ग्रामपंचायतस्तरावर दर आठवड्यात दवंडी देऊन ग्रामस्थांची या आजाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यासोबतच आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच गावागावात फॉगिंग केले जात आहे. मुलांचा डासांपासून बचाव करण्यासाठी झोपताना मच्छरदाणीचा वापर करण्याच्या सूचना करण्यात येत आहेत. यासोबतच कूलर आणि फुलदाणीतील पाणी नियमित बदलण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन न.प.चे प्रशासन अधिकार दिनेश बुधे व तालुका आरोग्य सहायक सोनवणे यांनी केले आहे.
सावनेरमध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढतीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 4:07 AM