लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढली आहे. मनपाद्वारे डेंग्यू प्रतिबंधाकरिता मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे विशेष मोहीम राबवून शहरात सर्वेक्षण केले जात आहे. एका दिवसात ८०४२ घरांची तपासणी केली. यापैकी ३७८ घरांमध्ये डेंग्यूची अळी आढळली.
मनपाचा चमू घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहे. कुलरमध्ये, टायरमध्ये व अन्य ठिकाणी पाणी साचले आहे का, याची पाहणी करून ज्यांच्या घरात पाणी साचले आहे त्यांना सूचना देत डेंग्यूचा संभाव्य धोका व त्यासाठी होणाऱ्या दंडाची माहिती दिली जात आहे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी २७३२ कूलर्सची तपासणी केली. यामधून ३१८ कूलर्समध्ये डास अळी मिळाली. कर्मचाऱ्यांनी २४७ कूलर्सला रिकामे करून टेमीफासची गोळी टाकली आणि २४८ ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत सुरू असलेल्या डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहिमेची प्रशासनाद्वारे पाहणी करून स्थितीचा आढावा घेतला.
लकडगंज झोनमधील प्रभाग ३५ अंतर्गत भीमनगर, गल्ली नं. ५ येथे डेंग्यूबाधित रुग्ण आढळल्याने मनपाद्वारे परिसरामध्ये आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. परिसरात धूर फवारणी, डासोत्पत्ती स्थानांमध्ये औषधांची फवारणी करण्यात आली.
महापौर दयाशंकर तिवारी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार घरांचे सर्वेक्षण सुरू आहे. मनपाद्वारे आवश्यक सर्व उपाययोजना तातडीने राबविण्यात यावे, असे निर्देश यावेळी उपायुक्त विजय देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तापाचे ९६ रुग्ण आढळले
मलेरिया व फायलेरिया विभागातर्फे २७ जुलैला सर्व दहा झोन मिळून ८०४२ घरांची तपासणी करण्यात आली. त्यात ३७८ घरांमध्ये डेंग्यूची अळी मिळाली तसेच ९६ तापाचे रुग्ण आढळले. विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले.