नागपूर : डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. जानेवारी ते ऑगस्ट या दरम्यान मेयो, मेडिकलमध्ये १०१७ रुग्णांनी उपचार घेतले. यातील १४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विशेष म्हणजे, रुग्णांमध्ये तरुणांची संख्या अधिक आहे.
दिवसेंदिवस डेंग्यूचा विळखा घट्ट होत चालला आहे. पाऊस लांबल्यास हा धोकाही वाढण्याची शक्यता आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मागील आठ महिन्यात ३ हजार १९१ डेंग्यू संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. यातील ८३० रुग्णांना डेंग्यू असल्याचे निष्पन्न झाले. ५१३ रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले, तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या २५वर रुग्ण उपचार घेत आहेत. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) आतापर्यंत १८७ डेंग्यू रुग्णांनी उपचार घेतले. यातील ११ रुग्णांचा मृत्यू झाला असून १५ रुग्ण उपचाराखाली आहेत.
-तरुणांमध्ये वाढतोय डेंग्यू
डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा ॲण्टीबायोटिक किंवा ॲण्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. मेयाेने उपलब्ध करुन दिलेल्या माहितीनुसार, डेंग्यूच्या १८७ रुग्णांमध्ये २७ रुग्ण हे १५ वर्षांच्या आतील आहेत. तर, १३० रुग्ण ३५ वर्षांखालील आहे. यातही २५ वर्षांखालील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यामुळे तरुणांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
-सिकलसेलबाधितांसाठी डेंग्यू ठरतोय धोकादायक
सर्वच ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण वाढले आहेत. परंतु सिकलसेलबाधितांमध्ये डेंग्यू धोकादायक ठरत आहे. जरीपटका येथील सिकलसेल सेंटरमध्ये रोज ३ ते ४ रुग्ण रुग्ण आढळून येत आहेत. सिकलसेलच्या रुग्णांमधील ‘सिकलिंग हिमोग्लोबिन’च्या प्रकारामुळे लाल रक्तपेशींचे आयुष्य कमी होते आणि त्या लवकर फुटतात. डेंग्यूमध्येही ‘हेमोरेजिक’ दिसून येत असल्याने धोका वाढतो. आतापर्यंत ६० ते ७० सिकलसेलच्या रुग्णांना डेंग्यू झाला आहे. यांच्यावर तातडीने उपचार महत्त्वाचा ठरतो.
-डॉ. विंकी रुघवानी, बालरोग तज्ज्ञ