लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरची परिस्थिती हलाखीची. वडील नाहीत. अशा परिस्थितीतही तिने हार मानली नाही. ती शिकली. स्वत:ही काम केले. उच्चशिक्षण घेतले. नुकतीच ती बँकेची परीक्षा पास झाली. येत्या ९ तारखेला बेंगळुरू येथील बँक आॅफ बडोदा येथे पीओ म्हणूून जॉईन करणार होती. परंतु नियतीला काही वेगळेच मंजूर होते. डेंग्यूने या होतकरू तरुणीला हिरावून घेतले. परिस्थितीला नमवणाºया या तरुणीला मृत्यूला मात्र हरवता आले नाही.डॉली मच्छिंद्र इंदूरकर (२५) रा. इंदोरा मॉडेल टाऊन असे या होतकरू तरुणीचे नाव. वडील मच्छिंद्र यांचा हार-फुले विकण्याचा व्यवसाय होता. दहा वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. आई कुमुद आणि लहान बहीण अंकिता एकटे पडले. आईने हिंमत हारली नाही. ती रुग्णालयात काम करून मुलींचा सांभाळ करू लागली. मुलींनीही त्यांना साथ दिली. परिस्थितीशी समर्थपणे तोंड देत दोन्ही बहिणी चांगल्या शिकल्या. एमबीए झाल्या. अंकिता एका खासगी कंपनीत काम करते. डॉलीसुद्धा काम करून शिकत होती. सोबतच स्पर्धा परीक्षेची तयारीही करीत होती. काही दिवसांपासून तिने पूर्णपणे बँकेच्या परीक्षेसाठी लक्ष केंद्रित केले होते वैशालीनगर येथे क्लासेसही तिने जॉईन केले होते. १८ सप्टेंबर रोजी परीक्षेचा निकाल आला. डॉलीने ही परीक्षा उत्तीर्ण केली होती. ती खूप आनंदात होती. शिकवणी वर्गातून ती टॉपर होती. त्यामुळे तिचा विशेष सत्कारही करण्यात आला होता. ती खूप खूष होती. यावेळी आपले मनोगतही तिने व्यक्त केले होते. सत्कारात मिळालेले स्मृतिचिन्ह घेऊन ती घरी आली तेव्हा शेजारच्या मुलामुलींनी तिला गराडा घातला होता. येत्या ९ आॅक्टोबर रोजी डॉली बेंगळुरू येथे बँक आॅफ बडोदामध्ये पीओ म्हणून रुजू होणार होती. गेल्या सोमवारी मेयोमध्ये तिची वैद्यकीय चाचणी झाली. त्यात ती फिट असल्याचे प्रमाणपत्रही मिळाले. मंगळवारी सायंकाळी अचानक तिला ताप आला. सदर येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये तिला भरती करण्यात आले. तेव्हा तिला डेंग्यू झाल्याचे निदर्शनास आले. तिच्यावर उपचार सुरू होता. परंतु प्रकृती सुधारण्याऐवजी आणखीनच बिघडत होती. रविवारी रात्री तिला धंताली येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. सोमवारी सायंकाळी ७.०५ वाजता डॉलीची प्राणज्योत मालवली. एका संघर्षमय जीवनाचा करुण अंत झाला.वाडीत चिमुकली दगावलीवाडी : नगर परिषद क्षेत्रातील हद्दीत गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सुरुवातीला ३४ रुग्णसंख्या असलेल्या वाडीत सध्या पाच रुग्ण असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यातीलच एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे वाडीत खळबळ उडाली असून आरोग्य विभागाविरुद्ध नागरिकांनी संताप व्यक्त केला. आरुषी हेमराज गायकवाड (९, रा. इंद्रायणीनगर, वाडी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती वाडीतीलच फ्लोरा कॉन्व्हेंटमध्ये चवथीत शिकत होती. गेल्या १५ दिवसांपूर्वी तिची प्रकृती खालावल्याने वाडीतील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते.सर्वत्र हळहळडॉली ही एक होतकरू व गुणवंत तरुणी होती. त्यामुळे ती मित्र-मैत्रिणींसह आपल्या वस्तीमध्ये सुद्धा सर्वांना आवडणारी होती. शिकवणी वर्गात तिचा सत्कार झाल्यावर ती स्मृतिचिन्हासह घरी आली तेव्हा वस्तीतील लहान-मोठ्या सर्वांनीच तिला गराडा घातला. त्यांच्यासोबत तिने फोटोही काढले. तिच्या कष्टाचे चीज झाले होते. बँक अधिकारी म्हणून तिचे पुढचे भविष्य अतिशय उज्ज्वल होते. परंतु तिच्या अचानक मृत्यूने आई-बहिणीसह वस्तीतील सर्वांनाच धक्का बसला आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
डेंग्यूने घेतला तरुणीचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 1:01 AM
घरची परिस्थिती हलाखीची. वडील नाहीत. अशा परिस्थितीतही तिने हार मानली नाही.
ठळक मुद्देबँकेची परीक्षा उत्तीर्ण : ९ तारखेला बेंगळुुरूला होणार होती जॉईन