नागपूर : हुक्का पार्लरमध्ये प्रवेश नाकारण्यावरून धरमपेठेत दोन गटांमध्ये टोळीयुद्ध सुरू झाले. कुख्यात गुन्हेगार सागर यादव याने प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांना शिवीगाळ करत माऊझरची भीती दाखवत धमकी दिल्याने गोकुळ पेठेत तणावाचे वातावरण पसरले होते. ही घटना रविवारी रात्री घडली. अंबाझरी पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल करून कुख्यात प्रीतम यादवसह सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे.
धरमपेठेतील गोकुळ पेठेत शोशा हुक्का पार्लर आहे. रविवारी साडेबारा वाजता सीताबर्डीतील सलमान सुफी त्याच्या सात-आठ साथीदारांसह शोशा हुक्का पार्लरमध्ये पोहोचला. हे हुक्का पार्लर प्रीतम यादव याचे आहे. हुक्का पार्लरमध्ये झालेल्या भांडणामुळे प्रीतम नेहमीच चर्चेत असते. हुक्का पार्लरचा दरवाजा बंद असल्याने सुफीने सुरक्षारक्षकाला पार्लरमध्ये प्रवेश देण्यास सांगितले. गर्दीचे कारण देत सुरक्षारक्षकाने सुफी आणि त्याच्या साथीदारांना प्रवेश देण्यास नकार दिला. सुफी आणि त्याच्या साथीदारांनी हुक्का पार्लरसमोर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. प्रीतम त्याच्या साथीदारांसह तेथे पोहोचला. त्याचा सुफी आणि त्याच्या साथीदारांशी वाद झाला. अचानक दोन्ही गटांनी एकमेकांना मारहाण सुरू केली.
दोन्ही गटांतील गुन्हेगारांनी काढला पळ
दरम्यान, शांतीनगरचा कुख्यात गुन्हेगार सागर यादव याने प्रतिस्पर्धी तरुणांवर माऊझर रोखत धमकी दिली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिस येण्याच्या भीतीने दोन्ही गटातील गुन्हेगार तेथून पळून गेले. काही वेळाने पुन्हा काही तरुण तेथे जमा झाले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सोमवारी या प्रकारचा व्हिडीओ समोर आल्यानंतर उपायुक्त राहुल मदने यांनी अंबाझरी पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
अंबाझरी पोलिसांनी प्रीतम यादवसह सहा आरोपींना ताब्यात घेतले. सुफी हा शेखू टोळीचा सदस्य आहे. पश्चिम नागपुरातील हुक्का पार्लर टोळीयुद्ध आणि मारामारीमुळे चर्चेत आहेत. अटक करण्यात आलेल्यांपैकी काही जणांनी दोन महिन्यांपूर्वी सोनेगाव येथे मेट्रोच्या मालमत्तेचेही नुकसान केले होते. याप्रकरणी प्रीतम यादवसह सहा आरोपींना सोनेगाव पोलिसांनी अटक केली होती.