नागपूर : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सोमवारी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन सिव्हिल लाइन्स येथे दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. मनपा व शासकीय दंत महाविद्यालयाच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.
महापौर दंत तपासणी शिबिरात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दंत तपासणी करून घेतली. तपासणीनंतर आवश्यकता असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दातांची सफाई, फिलिंगदेखील दंत महाविद्यालयाच्या चमूद्वारे करण्यात आली. तपासणीमध्ये मुख कर्करोगाचा धोका असलेल्यांना आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले. दातांच्या पुढील उपचारासाठी दंत महाविद्यालय व रुग्णालयामध्ये विशेष कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे.
महापौर दयाशंकर तिवारी यांनी शिबिराचे उद्घाटन केले. वैद्यकीय आरोग्य समिती सभापती महेश महाजन, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, ज्येष्ठ नगरसेविका आभा पांडे, उपायुक्त निर्भय जैन, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, दंत महाविद्यालयाचे डॉ. वैभव कारेमोरे व आदी उपस्थित होते.