नागपूर : दहा वर्षांपूर्वी गालाच्या हाडात कृत्रिम दंत प्रत्यारोपणाची प्रक्रिया अत्यंत किचकट होती; परंतु, आता नव्या तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया अचूक पद्धतीने करणे शक्य झाले आहे. याचा रुग्णांना मोठा फायदा होत असल्याची माहिती दंत प्रत्यारोपण क्षेत्रातील वरिष्ठ तज्ज्ञ डॉ. गुणसीलन राजन यांनी दिली.
‘इंडियन सोसायटी ऑफ ओरल इम्पलॅण्टोलोजिस्टस’ तर्फे आयोजित कृत्रिम दंत प्रत्यारोपणावरील २८ वी परिषदेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. शनिवारी परिषदेचा तिसरा दिवस होता. यावेळी डॉ. हेमांशू मेहता, डॉ. दीपक कामदार, डॉ अभय कोलते, शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर, डॉ. रिकीन गोगरी आदी उपस्थित होते.
- तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे भविष्यात समस्या
डॉ. राजन म्हणाले, गेल्या दहा वर्षांतील तांत्रिक प्रगतीने दंतचिकित्सा क्षेत्रात मोठा बदल दिसून येत आहेत. यामुळे कृत्रिम दंत प्रत्यारोपण अधिक अचूक होत आहेत. दीर्घकाळ टिकण्यासाठी मदत होत आहे; परंतु, तंत्रज्ञानावरील अति अवलंबित्वामुळे पुढील दहा वर्षांत समस्या निर्माण होऊ शकतात. भविष्यातील दंतवैद्यांची समस्या सोडवण्याची कौशल्ये संपुष्टात येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
- दंत चिकित्सक देत आहेत तिसरा दात
ज्येष्ठ मॅक्सिलोफेशियल सर्जन आणि दंतचिकित्सक डॉ. शिवाशंका म्हणाले की, देव आपल्याला दोन वेळा दात देतो. त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने दंत चिकित्सक तिसरा; परंतु, कृत्रिम दात देतो. या कृत्रिम दाताची चांगली काळजी घेतले तर ते आयुष्यभर टिकतात.
- मधुमेह, रक्तदाबाच्या रुग्णांवरही दंत प्रत्यारोपण
पीरियडॉन्टिस्ट व इम्प्लांटोलॉजिस्ट डॉ. तुषार श्रीराव म्हणाले, मधुमेह, रक्तदाबाबसह इतरही आजार असलेल्या रुग्णांमध्येही कृत्रिम दंत प्रत्यारोपण शक्य आहे; परंतु, याबाबत अनेक गैरसमज आहेत. खरेतर, दात असतील तर चांगले खाणे होईल, पोषण मिळेल याचा फायदा मधुमेह, रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल.