मुंबई : मुंबईमेट्रो रेल कॉपोर्रेशनच्या (एमएमआरसी) व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार रणजीतसिंह देओल यांनी गुरुवारी स्वीकारला. रणजीतसिंह देओल हे भारतीय प्रशासकीय सेवेतील १९९८च्या बॅचचे अधिकारी आहेत. रणजीतसिंह देओल यांनी अश्विनी भिडे यांच्याकडून हा पदभार स्वीकारला. या वेळी दोघांनी एकमेकांना नवीन कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
मेट्रो-३सारख्या आव्हानात्मक प्रकल्पाच्या दृष्टीने रणजीतसिंह देओल यांची नियुक्ती महत्त्वाची समजली जाते. मेट्रो-३द्वारे उपनगरीय रेल्वेद्वारे जोडले न गेलेले महत्त्वाचे भाग तर जोडले जाणारच आहेत. तसेच उपनगरीय रेल्वेवरील ताण कमी होऊन रोज रेल्वे अपघातांमध्ये जाणारे हकनाक जीवदेखील वाचणार आहेत. रणजीतसिंह देओल यांना शासनाच्या वेगवेगळ्या पदांवर काम केल्याचा २० वर्षांहून अधिक अनुभव आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि उपाध्यक्ष असताना अपघात टाळण्यासाठी त्यांनी बसबांधणीसाठी माईल्ड स्टीलचा वापर करण्याची संकल्पना दिली होती. त्यांच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कारकिर्दीदरम्यान व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम आणि प्रवासी माहिती यंत्रणा कार्यान्वित झाल्या. शिवशाही बसेस, स्मार्ट काडर््स, ई-तिकिटिंग तसेच संवेदनशील बसस्थानकांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. रणजीतसिंह देओल यांनी इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीची पदवी संपादन केली असून, मॅक्सवेल स्कूल आॅफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन, न्यूयॉर्क येथून एक्झिक्युटिव्ह मास्टर्स इन पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन ही पदवी संपादन केली आहे.