१३ पैकी ११ जागा जिंकल्या
कैलास निघोट
देवलापार : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या देवलापार ग्रा.पं.च्या निवडणुकीत १३ पैकी ११ जागांवर विजय मिळवित काँग्रेससमर्थीत पॅनेलने वर्चस्व सिद्ध केले आहे. याआधी या ग्रा.पं.मध्ये मिश्र बहुमत होते. ही ग्रा.पं. जिंकण्यासाठी जि. प. अध्यक्षा रश्मी बर्वे, पं. स. सभापती कला ठाकरे, जि. प. सदस्य कैलास राऊत, शांताताई कुमरे यांनी आखलेली रणनीती कामी आली.
वॉर्ड क्रमांक १ मध्ये विनोद मसराम, प्रणाली सरोदे, सारिका उईके, वॉर्ड क्रमांक २ मधून प्रमोद कुमरे व सुमन डोंगरे (निर्विरोध), वॉर्ड क्रमांक - ४ मध्ये लक्ष्मण राऊत, मोनिका पोहरे व शिल्पा पेंदाम विजयी झाले. वॉर्ड क्रमांक ५ मध्ये शाहिस्ता पठाण, सुधाकर भलावी, तर मनीष जवंजाळ यांनी बाजी मारली. वॉर्ड क्रमांक ३ मध्ये काँग्रेसविरोधी गटाचे रामरतन गजभीये व रंजना वरठी यांनी विजय मिळविला.
आता सरपंच आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २०१० मध्ये येथील सर्वपक्षीय उमेदवारांनी १३ पैकी १२ जागांवर विजय मिळविला होता. काँग्रेसचे इसराईल पठाण यांनी १३ जागा लढविल्या होत्या. त्यावेळी त्यांना केवळ एकच जागा मिळविता आली. त्यावेळी अनुराधा कोडापे या एकट्याच विजयी झाल्या होत्या.
अशातच सरपंच व उपसरपंच कोण, यावरून १२ जागा जिंकूनही वादविवाद निर्माण झाला होता. यात काँग्रेसच्या अनुराधा कोडापे यांनी बाजी मारली होती. २०१५ च्या निवडणुकीतही अशाच प्रकारचे वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार विजयी झाले होते. तीत संजय जैस्वाल सरपंच झाले होते. कालांतराने त्यांचे एक सदस्य मरण पावले व चार सदस्य काही कारणास्तव अपात्र ठरल्याने पाच पदांसाठी पोटनिवडणूक झाली व पाचही सदस्य निर्विरोध झाले होते. त्यामुळे यावेळी सरपंच पदाची निवड होताना देवलापारमध्ये काय घडामोडी होतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.