नागपूर : वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गावरील मुख्य स्थानकांपैकी एक असलेले देवळी रेल्वे स्थानक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसह कार्यान्वित झाले आहे. वर्ध्यापासून १५ किमी अंतरावर देवळी हे पहिले रेल्वे स्थानक आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील व्यापार-उद्योगाला भरभराटीस नेण्याची क्षमता असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षभरापासून खास प्रयत्न करीत आहेत. या प्रकल्पाला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सरकारने 'स्पेशल वॉर रूम' तयार केली असून कामाच्या प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेतला जातो.
लोकमत एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांचा हा रेल्वे मार्ग ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. या प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण व्हावे यासाठी ते सर्वच संबंधितांशी वेळोवेळी चर्चा करून सातत्याने पाठपुरावा करीत असतात. या पार्श्वभूमीवर, देवळी स्थानक इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगसह कार्यान्वित करण्यात आल्याचे वृत्त मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आज दिले आहे.
देवळी स्थानकाची ठळक वैशिष्ट्ये
- तीन लाईन : एक मुख्य आणि दोन सामान्य लूप लाईन- सिग्नल्सची संख्या : १२ मुख्य आणि ३ शंट सिग्नल- लोको इंजिन स्थिर करण्यासाठी १ साइडिंग- इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टीमला संरक्षित करण्यासाठी क्लास ए अर्थिंग संरक्षण - वर्धा स्टेशनवरून कनेक्टिव्हिटी : ऑप्टिकल फायबर आणि कॉपर केबल- विभागात कोणतीही घटना घडल्यास विभाग नियंत्रकांशी संपर्कासाठी १५ किलोमीटरच्या संपूर्ण विभागात १ किमी अंतराने ईसी सॉकेटभिडी आणि कळंबही प्रगतीपथावर
वर्धा - यवतमाळ देवळी स्थानकापासून काही किलोमिटर अंतरावर असलेल्या भिडी आणि कळंब रेल्वे स्थानकाच्या विकासाचे कामही झपाट्याने सुरू असून लवकरच हे कामसुद्धा पुर्ण होणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.