अप्रमाणित बियाणे : सोयाबीन, कापूस व धान बियाण्यांचा समावेशजीवन रामावत नागपूरयंदाच्या खरीप हंगामात बोगस बियाण्यांची प्रचंड विक्री झाली आहे. त्यामुळे रोज नवनवीन कंपन्यांविरुद्ध शेतकऱ्यांच्या तक्रारी पुढे येत आहेत. यात हिंगणघाट येथील यशोदा हायब्रिड सिड्स या सारख्या काही कंपन्याविरूद्ध गुन्हे सुद्धा दाखल झाले. शिवाय कृषी विभागाने पुन्हा काही कंपन्यांच्या मुसक्या आवळण्याची तयारी चालविली आहे. सोबतच आता अप्रमाणित बियाणे प्रकरणी तब्बल ६८ खटले दाखल केले जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. माहिती सूत्रानुसार, कृषी विभागाने सोयाबीन, कापूस व धान या तीन पिकांच्या बियाण्यांचे एकूण १ हजार २०६ नमुने काढले होते. त्यात १४३ नमुने बियाणे उत्पादक कंपनीतून घेण्यात आले होते, तर उर्वरित १ हजार ६३ नमुने बियाणे विक्रेत्यांकडून काढण्यात आले. यानंतर त्यापैकी ७३२ नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे, त्यापैकी १०७ नमुन्यांचा अहवाल हा अप्रमाणित (फेल) आला आहे. विशेष म्हणजे, यामध्ये बियाणे उत्पादक क्षेत्रातील मोठमोठ्या कंपन्यांचा सुद्धा समावेश आहे. महाबीजचे ११ नमुने फेल नागपूर : कृषी विभागाच्या माहितीनुसार सोयाबीन बियाण्यांमध्ये अकोला येथील महाबीज, नागपुरातील अंकूर सिड्स प्रा. लि., बसंत अॅग्रोटेक प्रा. लि., इंदौर येथील ईगल सिड्स अॅण्ड बायो, फार्म इनपुट ट्रेडिंग, नागपुरातील महागुजरात सिड्स प्रा. लि, हिंगणघाट येथील यशोदा हायब्रिड सिड्स प्रा. लि. व पाचोरा येथील निर्मल सिड्स प्रा. लिमिटेड या कंपन्यांचे एकूण १६ नमुने फेल आले आहेत. तसेच कापूस बियाण्यांमध्ये औरंगाबाद येथील अजित सिड्स, दिल्ली येथील बायर बायो सायन्स प्रा. लि, सिकंदराबाद येथील कावेरी सिड्स, जालना येथील कृषीधन सिड्स, औरंगाबाद येथील किर्तीमान अॅग्रो जेनेटिक्स, हैदराबाद येथील निझिविडू सिड्स, अहमदाबाद येथील नवकर हायब्रिड, श्री सत्या अॅग्री बायोटेक प्रा. लि,राजकोट येथील सोलर अॅग्रोटेक प्रा. लि. व हैदराबाद येथील लाया सिड्स प्रा. लिमिटेड या कंपन्यांचे १४ आणि धान बियाण्यांमध्ये अकोला येथील महाबीज, बसंत अॅग्रोटेक, सेलू येथील दफ्तरी अॅग्रो सिड्स प्रा. लि., गोंदिया येथील केशव खनक सिड्स, नागपुरातील महागुजरात सिड्स प्रा. लि., माणिक्य सिड्स, हिंगणघाट येथील रायझिंग सन सिड्स, श्री गोकुल, विश्वरूप सिड्स व हिंगणघाट येथील यशोदा हायब्रिड सिड्स प्रा. लिमिटेड या कंपन्यांचे ७७ नमुने अप्रमाणित ठरले आहेत. यामध्ये यशोदा हायब्रिड सिड्स प्रा. लिमिटेडचे सर्वांधिक म्हणजे, ४० नमुने फेल आले असून, त्यापाठोपाठ रायझिंग सन कंपनीचे १९, महाबीजचे ११ आणि महागुजरात सिड्स प्रा. लिमिटेडच्या ६ नमुन्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
कृषी विभाग ६८ खटले दाखल करणार
By admin | Published: October 17, 2016 2:42 AM