सुमेध वाघमारे
नागपूर : दोन्ही मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आशेचे किरण ठरले आहे. परंतु मागील वर्षी कोरोनामुळे तर आता आरोग्य विभागाच्या आडमुठेपणामुळे प्रत्यारोपण थांबले आहे. परिणामी, तब्बल ३५ वर रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. विशेष म्हणजे, नेफ्रोलॉजी विभागात ‘ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर’ म्हणून नव्या डॉक्टरांची भरती करण्यात आली. परंतु प्रत्यारोपणासाठी कुणीच पुढाकार घेत नसल्याने त्यांच्या वेतनावर होणाऱ्या लाखो रुपयांच्या खर्चाला जबाबदार कोण, हा प्रश्न आहे.
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या पुढाकाराने सुरू झाले. फेब्रुवारी २०१६ मध्ये त्यावेळच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेतून पहिल्या रुग्णावर यशस्वी प्रत्यारोपण झाले. परंतु पाच वर्षांचा कालावधी होऊनही केवळ ६५ रुग्णांवरच मूत्रपिंड प्रत्यारोपण होऊ शकले आहे. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी दोन वर्षांपूर्वी आठवड्यातून एकदा प्रत्यारोपण करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी त्यांचा पाठपुरावाही केल्याने प्रत्यारोपणाने वेग धरला. रुग्णांची गर्दीही वाढली. मात्र मार्च २०२० पासून कोरोनाचे रुग्ण वाढताच प्रत्यारोपण शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या. डिसेंबर २०२०मध्ये एका ‘ब्रेन डेड’ रुग्णाकडून मिळालेले मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सोडल्यास त्यानंतर एकही प्रत्यारोपण झाले नाही.
-दर पाच वर्षांनी आरोग्य विभागाची घ्यावी लागते मंजुरी
अवयव प्रत्यारोपण केंद्राला दर पाच वर्षांनी आरोग्य विभागाची मंजुरी घ्यावी लागते. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा मूत्रपिंड प्रत्यारोपणाला मागील वर्षी पाच वर्षे पूर्ण झाल्याने डिसेंबर महिन्यात मंजुरीसाठी आरोग्य विभागाला प्रस्ताव पाठविला. परंतु आता सहा महिन्यांचा कालावधी होऊनही मंजुरी मिळाली नाही. एकीकडे शासन अवयव प्रत्यारोपणाला प्रोत्साहन देत असताना दुसरीकडे त्यांचेच अधिकारी छोट्याछोट्या त्रुटी काढून आडमुठेपणाचे धोरण स्वीकारत असल्याने रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे.
-दीड वर्षांत केवळ एकच ‘ब्रेन-डेड’ व्यक्तीकडून अवयवदान
मेडिकल व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आठवड्यातून एक तरी ‘ब्रेन-डेड’ म्हणजे मेंदू मृतव्यक्ती आढळून येते. अशा रुग्णांच्या नातेवाईकांचे समुपदेशन करून अवयवदान केल्या जाऊ शकते. यासाठी नुकतीच नव्या डॉक्टरांची चमू तैनात करण्यात आली. परंतु जबाबदारी घ्यायला कुणी पुढाकार घेत नसल्याने मागील दीड वर्षांत केवळ एकच ‘ब्रेन-डेड’व्यक्तीकडून अवयवदान होऊ शकले आहे. त्या तुलनेत खासगी रुग्णालयांमध्ये आतापर्यंत जवळपास दहावर मेंदू मृत व्यक्तीकडून अवयवदान झाले आहे.
वर्ष :मूत्रपिंड प्रत्यारोपण
२०१६ :०९
१०१७ :१७
२०१८ :१३
२०१९ : ११
२०२० : १५
(मार्चपर्यंत)