नागपूर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नागपूर विभागीय कार्यालयाने जल आणि वायू प्रदूषण करणाऱ्या विदर्भातील कंपन्यांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३६ कंपन्यांना शो कॉज नोटीस, १४ कंपन्यांना सुधारणा नोटीस आणि ९ कंपन्यांना प्रदूषण नियंत्रणात सुधारणा करण्याची अखेरच्या संधीची नोटीस बजावली आहे. त्यानंतरही सुधारणा न करणाऱ्या कंपन्यांना विभाग थेट टाळे ठोकणार आहे.
विभागाच्या अधिकाऱ्यांनी जानेवारी २०२३ पासून केलेल्या तपासणीची ही आकडेवारी आहे. याआधी विभागाने काही कंपन्यांना टाळे ठोकले आहे. कंपन्यांच्या वाढत्या प्रदूषणावर विभाग अधिक सजग झाला आहे. कंपन्या रसायनयुक्त पाणी नदी-नाल्यात सोडल्याने पिण्यायोग पाणी अशुद्ध झाल्याच्या तक्रारी विभागाकडे आल्या आहेत. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटी आणि नियमांचे पालन राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाला करावे लागते. नियम आता अधिक कठोर झाले आहेत. शिवाय राज्याच्या वेगळ्या काही अटी आहेत. कंपन्यांवर नियमित तपासणीदरम्यान, तर काहींवर तक्रारींच्या आधारे कारवाई केली जाते. याशिवाय परवाना नसतानाही सुरू असलेल्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
विभागाच्या प्रयोगशाळेत नमून्यांचे विश्लेषणजल आणि हवेच्या गुणवत्तेची तपासणी विभागाच्या उद्योग भवन, सिव्हील लाईन्स येथील स्वत:च्या प्रयोगशाळेत करण्यात येते. या प्रयोगशाळेत संपूर्ण विदर्भातून नमूने तपासणीसाठी येतात. एक आठवडा ते एक महिन्यात नमून्याचा अहवाल येतो. त्या आधारे संबंधित अधिकारी कंपन्यांवर कारवाई करतात.
शो कॉज नोटीस बजावलेल्या काही कंपन्या :- ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स प्रा.लि. कामठी रोड, नागपूर.- जेएसडब्ल्यू स्टील कोटेड प्रा.लि., कळमेश्वर.- रांजनगाव ऑईल प्रा.लि., मोहाडी, भंडारा.- कोराडी थर्मल पॉवर प्लॅन्ट, कोराडी, नागपूर.
सुधारणा नोटीस बजावलेल्या काही कंपन्या :- ईआरए बिलसेस प्रा.लि., उमरेड, नागपूर.- मिनेक्स मेटॅलर्जिकल कं.लि., कळमेश्वर, नागपूर.- भवानी स्टोन क्रशर, देवळी, वर्धा.
अखेरची नोटीस बजावलेल्या काही कंपन्या :- एन.पी. इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि., काटोल, नागपूर.- इव्होनिथ व्हॅल्यू स्टील लि., भूगांव, वर्धा.- क्लॅरिऑन ऑर्गनिक लि., तुमसर, भंडारा.
सुधारणा करा, अन्यथा कंपन्यांना टाळे ठोकणारविभाग स्तरावर विदर्भातील कंपन्यांच्या प्रदूषण स्तराची वारंवार तपासणी करण्यात येते. त्रूटी आढळल्यास सुधारणा करण्याची नोटीस देण्यात येते. अखेरच्या नोटीसानंतरही सुधारणा न केल्यास कंपन्यांना थेट टाळे ठोकण्यात येतात. प्रदूषणाचा स्तर नियंत्रणात राहण्यासाठी विभागाची तपासणी मोहीम सुरू असते. - अशोक करे, नागपूर विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ.