नागपूर : अमरावतीला जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या नागपूर विभागाने विना वाहक बसेस सुरू केल्या आहेत. यामुळे नागपूरवरून सुटलेली बस मध्ये कुठेच थांबा न घेता थेट अमरावतीला थांबत असून या प्रयोगामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होत आहे.
अमरावतीला जाताना पूर्वी कोंढाळी, कारंजा, तळेगाव येथे एसटीची बस थांबत होती. त्यामुळे प्रवासी घेण्यासाठी आणि उतरविण्यासाठी वेळ वाया जात होता. परंतु आता एसटी महामंडळाने अमरावतीसाठी २८ विना वाहक बसेस सुरू केल्या आहेत. त्यानुसार गणेशपेठ आगार आणि रविनगर येथून प्रवासी भरले की या बसेस विना वाहकाच्या अमरावतीला जात आहेत. मार्गात कुठेच या बसेस थांबत नसल्यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होत आहे. एसटीच्या या नव्या प्रयोगाला प्रवाशांनीही चांगला प्रतिसाद दिला असून या सर्वच बसेस फुल होऊन अमरावतीला जात आहेत. सकाळी ६ ते सायंकाळी ७.३० दरम्यान या बसेस धावत असून या बसेसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती गणेशपेठ आगाराचे व्यवस्थापक अनिल आमनेरकर यांनी दिली. आणखी काही मार्गावर विना वाहक बसेस सुरू करण्याचा एसटी महामंडळाच्या विचाराधीन आहे.
..............