लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी महाराष्ट्र व मराठवाड्याच्या विकासासाठी खूप परिश्रम केले होते. संवेदनशील व्यक्तिमत्त्व असलेले सातव यांच्याशी वैचारिक मदभेद असले, तरी त्यांच्याशी माझे चांगले संबंध होते. ते लंबी रेस का घोडा ठरतील, असा विश्वास होता. मात्र, त्यांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे, अशी भावना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. उन्नती फाउंडेशनतर्फे आयोजित श्रद्धांजली सभेत राजीव सातव यांना ऑनलाइन माध्यमातून सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी लोकमत वृत्तपत्रसमूहाच्या एडिटोरिअल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, काँग्रेसचे शहराध्यक्ष आ. विकास ठाकरे, भाजपचे प्रवक्ते आ. गिरीश व्यास, माजी मंत्री अनिस अहमद, गिरीश गांधी, माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अनिल अहिरकर, मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी, राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव, त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव, बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे विलास गजघाटे, उन्नती फाउंडेशनचे अध्यक्ष अतुल कोटेचा प्रामुख्याने उपस्थित होते.
कठीण परिस्थितीत राजीव सातव यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. त्यांचा युवक काँग्रेसचा परिवार संपूर्ण देशात पसरला होता व त्यांनी देशात स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्यांनी लोकांमध्ये विश्वास जागविण्याचे काम केले. पक्षातदेखील ते कुठल्याही पदासाठी स्वतःचे नाव देत नव्हते. लोकसभेत त्यांनी कुणावर अकारण टीका केली नाही. कुणाबद्दल त्यांच्या मनात द्वेष नव्हता. त्यांच्या निधनामुळे देशाचे नुकसान झाले आहे, असे प्रतिपादन विजय दर्डा यांनी केले. याप्रसंगी सर्वपक्षीय नेत्यांनी सातव यांचे कार्य व त्यांच्याशी संबंधित आठवणींवर प्रकाश टाकला. सर्वांनी दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली. श्वेता शेलगावकर यांनी संचालन केले.