परिसंवाद : राम नेवले यांचे प्रतिपादन नागपूर : सरकार कुणाचेही असो, आजवर शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणत्याच सरकारने ठोस काम केलेले नाही. औद्योगिक विकासासाठी उद्योगपतींना सर्व सुखसोयी तातडीने उपलब्ध करून दिल्या जातात. परंतु शेतकऱ्यांबाबत मात्र उदासिनता दाखविली जाते. उत्पादन खर्चाएवढा भावही शेतकऱ्यांना मिळत नाही, मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली तरी शासन तो मिळू देत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करणार नाही, तर काय करणार. शेतकऱ्यांच्या आत्महत्या खरंच थांबवायच्या असतील तर थातूरमातूर कारवाई करून होणार नाही, त्यासाठी मार्शल प्लॅन लागू करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे संयोजक राम नेवले यांनी केले. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने चिटणीस पार्क येथे सुरू असलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनादरम्यान आयोजित दुसऱ्या सत्रातील ‘विदर्भातील शेती, शेतमालाचे भाव, सिंचनाचा अनुशेष परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ या विषयावर आयोजित परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. डॉ. मानवेंद्र काचोळे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, शेतीच्या भरवशावरच जगातील सर्व प्रगत राष्ट्रांनी आपापल्या देशाला विकसित केले आहे. परंतु आपल्या देशात औद्योगिक विकास साधण्यासाठी शेतीकडे दुर्लक्ष होत गेले. त्याचे परिणाम आज दिसून येत आहेत. धर्मराज रेवतकर यांनी विदर्भातील सिंचनाच्या अनुशेषावर प्रकाश टाकला. संध्या एदलाबादकर यांनी विदर्भ पॅकेज शेतकऱ्यांसाठी कसे फोल ठरेल, हे समजावून सांगितले.तर नितीन रोंघे आणि अविनाश काळे यांनी स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय विदर्भाचा विकास अशक्य असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)आज समारोप विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा उद्या दुपारी ३ वाजता समारोप करण्यात येईल. डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारोपीय कार्यक्रमात वामनराव चटप व राम नेवले प्रमुख वक्ते राहतील. तत्पूर्वी ‘औद्योगिकीकरण, प्रदूषण, भारनियमन, व्यापारी समस्या’ या विषयावर सकाळी १० ते १२ या वेळात परिसंवाद, अध्यक्षस्थानी डॉ. श्रीनिवास खांदेवाले, सुधीर पालीवाल, परमजित आहुजा, विजय निवल, मृणालिनी फडणवीस, संजय कोल्हे, किशोर पोतनवार प्रमुख वक्त ेराहतील. ‘आदिवासी, वनविकास, भटक्या विमुक्तांच्या समस्या, कुपोषण, बांबू कामगारांचे प्रश्न व संपुष्टात आलेली बारा बलुतेदारी’ विषयावर दुपारी १२ वा. परिसंवाद होईल. धनंजय धार्मिक, अॅड. नंदा पराते, पारोमिता गोस्वामी, डॉ. वासुदेव फडके सहभागी होतील.
शेतकऱ्यांबाबतच नेहमी उदासीनता
By admin | Published: December 14, 2014 12:43 AM