लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काेराेनाची दुसरी लाट आता ओसरायला लागली आहे पण या लाटेने खूप काही नेले आहे. विशेषत: काेराेनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लाेकांच्या मनस्वास्थ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. आर्थिक, सामाजिक समस्या, राेजगार अशा चिंतासह आपले व कुटुंबाचे काय हाेईल अशा विचारांचा घाेर लागला असून या चिंतेमुळे डिप्रेशनमध्ये (नैराश्य) जाणाऱ्यांचे प्रमाण ६० टक्केच्या जवळपास वाढल्याचे निदर्शनास येत आहे. हे नैराश्य घालविण्यासाठी यावरील औषधांची विक्रीदेखील २०-३० टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येत आहे.
डिप्रेशन वाढण्याची कारणे
मानसिक आराेग्य खालावण्यामागे काेराेनाची भीती आणि आर्थिक असुरक्षा हे महत्त्वाचे कारण आहे. मानसाेपचार तज्ज्ञ डाॅ. सागर चिद्दरवार यांच्यामते काेराेनामुळे अनेकांनी आप्तेष्टांना गमावले, अनेकांना वाचविलेही आहे, अनेकजण काेराेनातून सुखरूप बरेही झाले आहेत पण हा अनुभव आजही त्यांच्यासाठी अस्वस्थ करणारा ठरताे. आपल्याला पुन्हा काेराेना झाला तर, आपणही गेलाे तर कुटुंबाचे काय हाेईल, ही भीती वाढली आहे. साेशल मीडिया व वाहिन्यांवरील बातम्यात काेराेना, बाहेर फिरला तर काेराेना हाेईल, घरी राहिले तर काेराेनाचीच चर्चा यामुळे काही लाेकांच्या मनात धास्ती वाढली आहे. लाॅकडाऊनमध्ये लाेक घरीच राहिले, हाताला काम नाही, जीवनशैलीत झालेला बदल, अपुऱ्या साेयीसुविधा यामुळे परिस्थिती आणखीनच बिघडली आहे.
औद्याेगिक मानसाेपचार तज्ज्ञ डाॅ. वृशाली राऊत यांच्यामते आर्थिक अस्थिरता हे नैराश्याचे महत्त्वाचे कारण आहे. अनेकांचे राेजगार गेले, काम बंद झाले, अनेकांचे व्यवसाय बंद पडल्याने आलेले आर्थिक संकट. अशावेळी कुटुंबाच्या गरजा कशा भागवाव्या या चिंतेने नैराश्य आले आहे. यामुळे व्यसनाधीनता, स्वत:ला व इतरांना त्रास देणे तसेच औषध घेण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.
डिप्रेशन टाळण्यासाठी हे करा
- आता गरज आहे ती आपल्या व कुटुंबाच्या आराेग्यासाठी प्रयत्न करण्याची आहे, हे लक्षात घेणे.
- काेराेनाबाबतचे वृत्तांत, संदेश पाहताना, वाचताना सजग राहणे. टीव्हीवरील मनाेरंजक कार्यक्रम पाहा.
- अस्वस्थ वाटू लागेल अशा बातम्या, साेशल मीडियावरील पाेस्ट पाहणे, वाचणे टाळा.
- जवळच्या, विश्वासू व्यक्तीशी संवाद साधा व मनमाेकळे व्हा.
- नियमित व्यायाम करा, ध्यान करा, सकारात्मक विचार करा.
- मानसिक आराेग्याबाबत तक्रार असेल तर मानसाेपचार तज्ज्ञांना भेटून चर्चा करा.
औषधांची विक्री २०-३० टक्क्यांनी वाढली
महाराष्ट्र राज्य फार्मसी काैन्सिलचे सदस्य हरीश गणेशानी यांनी सांगितले, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लाेकांमध्ये खराेखरच नैराश्य आल्याचे दिसत आहे. नैराश्य घालविण्यासाठी लागणारे, झाेप येण्यासाठी लागणाऱ्या औषधांच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मानसिक तणावासह भीतीमुळे वाढ झालेल्या रक्तदाब (बीपी), हृदयविकाराच्या औषधांच्या विक्रीतही २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अशी परिस्थिती पूर्वी कधीही पाहिली नाही व बेसावधपणे ठेच लागावी तसे लाेकांचे झाले आहे. अनेक वाईट अनुभवांमुळे औदासिन्य वाढले आहे. यातून व्यसनाधीनता, चिडचिड व इतर समस्याही वाढल्या आहेत. सर्वांची हानी झाल्याने व्यवसाय बुडाल्याचे वैषम्य कमी आहे पण मानसिक आजाराबाबत जागरूकता येत आहे. अनपेक्षित परिस्थितीमुळे ताण येणारच पण यातून मार्ग काढण्यासाठी आपल्या हाती नेमके जे आहे, त्यावर काम करावे लागेल.
- डाॅ. सागर चिद्दरवार, मानसाेपचार तज्ज्ञ
व्यक्ती असाे किंवा देश, आर्थिक स्थिती स्थिर असली तर मानसिक आराेग्य चांगले राहते. प्रत्येकालाच आर्थिक समस्या साेडविण्यासाठी सकारात्मक राहून प्रयत्न करावे लागतील. सरकारनेही लाेकांची आर्थिक असुरक्षा दूर करण्यासाठी उपाय करणे गरजेचे आहे. मानसिक आजाराविषयी लपविण्यापेक्षा खुलून बाेलावे. शासकीय किंवा खाजगी क्षेत्रात कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या मानसिक आराेग्यासाठी उपाययाेजना व मानसाेपचार तज्ज्ञांची नियुक्ती करणे. आयडियल व्यवस्था निर्माण व्हावी.
- डाॅ. वृशाली राऊत, औद्याेगिक मानसाेपचार तज्ज्ञ