कामठीत भाजपाचे वर्चस्व
कामठी तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली. येथे निवडणूक झालेल्या नऊपैकी सहा ग्रा.पं.वर भाजपा समर्थित गटाचे सरपंच आणि उपसरपंच विजयी झाले. काँग्रेस समर्थित गटाचा केवळ तीन गावात विजय झाला. भाजपाचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे होमटाऊन असलेल्या कोराडी ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपाचे नरेंद्र धानोले विजयी झाले.
बिनविरोेध आदासा येथे उपसरपंच पदासाठी निवडणूक
कळमेश्वर तालुक्यात पाचही ग्रा.पं.च्या सरपंचपदी काँग्रेस समर्थित उमेदवार विजयी झाले. तालुक्यात बिनविरोध निवडणूक झालेल्या सोनपूर (आदासा) ग्रा.पं.च्या सरपंचपदी काँग्रेसच्या नीतू सहारे बिनविरोध विजयी झाल्या. मात्र उपसरपंच पदाच्या निवडणुकीत येथे काँग्रेसचे दोन गट पडले. यात नीलेश कडू यांनी चेतन निंबाळकर यांचा एक मताने पराभव केला. कडू यांना पाच तर निंबाळकर यांना चार मते पडली.
सेनेच्या गडात काँग्रेसचे सरपंच, मनसेनेही उघडले खाते
शिवसेनाचा गड असलेल्या रामटेक मतदार संघातील नऊपैकी सात ग्रा.पं.मध्ये काँग्रेस समर्थित गटाचे सरपंच विजयी झाले आहेत. यासोबतच तालुक्यात पथरई ग्रा.पं.च्या सरपंचपदी मनसे समर्थित संदीप मनिलाल वासनिक विजयी झाले आहेत. मानापूर ग्रा.पं.मध्ये शिवसेना समर्थित संदीप मधुकर सावरकर यांची सरपंचपदी वर्णी लागली. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या देवलापार ग्रा.पं.वर काँग्रेसने झेंडा फडकविला. येथे काँग्रेसच्या शाहिस्ता इलियाज खान पठाण यांची सरपंचपदी अविरोध निवड झाली. येथे १३ पैकी ११ जागांवर काँग्रेस समर्थित गटाचे सदस्य विजयी झाले आहेत. तालुक्यात दाहोदा ग्रा.पं.मध्ये आरक्षणानुसार उमेदवार नसल्याने सरपंचपदाच्या निवडणूक झाली नाही. येथे काँग्रेस समर्थित पॅनेलचे स्वप्निल सखाराम सर्याम उपसरपंचपदी विजयी झाले.
काँग्रेसचा ८३ तर भाजपाचा ७३ ग्रा.पं.वर दावा
सरपंचपदाच्या निवडणुकीनंतर राजकीय पक्षाकडून दावे-प्रतिदावे करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी ८३ ग्रा.पं.मध्ये काँग्रेसचे तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी ७३ ग्रा.पं.मध्ये भाजपाचे उमेदवार सरपंच झाल्याचा दावा केला आहे. या दोघांच्या दाव्यांची बेरीज १५६ इतकी होते. मात्र जिल्ह्यात प्रत्यक्षात १२९ ग्रा.पं.साठी निवडणुका झाल्या आहेत.