नागपूर : तातडीने ऐच्छिक ठिकाणी पोहचण्यासाठी विमानाची महागडी तिकिट घेऊन प्रवासी हवाई प्रवास करतात. मात्र, अनेकदा विमान कंपनीच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशाला पाहिजे त्या ठिकाणी वेळेवर पोहचता येत नाही. त्यामुळे संबंधित प्रवाशाला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. गुरुवारी असाच प्रकार घडला. येथील एका डॉक्टर भावाला त्यांच्या बहिणीच्या अंतिम दर्शनापासून वंचित ठेवण्याचे पातक एका विमान कंपनीने केले.
नागपुरातील डॉ. दिलीप भंभानी (वय ७०) यांच्या दिल्लीतील बहिणीचे निधन झाले. गुरुवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी आणि त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी डॉ. भंभानी यांनी गो फर्स्टचे विमान जी ८- २५१६ मध्ये तिकिट बूक केली. सकाळी ८.१० वाजता हे नागपूर ते दिल्ली विमान उडणार असल्याने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते नियोजित वेळेपूर्वी पोहचले. त्यांच्यासह एकूण १३० प्रवाशांना बोर्डिंग पास देण्यात आली. मात्र, वेळेवर सोडा, अडीच तास विलंब होऊनही विमान काही उडले नाही. त्यामुळे डॉ. भंभानी बहिणीचे अंतिम दर्शन घेऊ शकले नाही. दरम्यान, प्रवाशांचा गोंधळ वाढल्याने विमान कंपनीचे कर्मचाऱ्यांनी त्यांना थातुरमातून उत्तरे देऊन, नाश्ता देतो, असे सांगून शांत करण्याचा प्रयत्न केला. तब्बल अडीच तासांच्या विलंबाने मुंबईहून एक विमान आले आणि नागपुरातील प्रवाशांना घेऊन दिल्लीला झेपावले.
परतीचाही मार्ग रोखला
तिकिट बुकींगनंतर संबंधित एअरलाईन्स कंपनीने जबाबदारीने काम करण्याची गरज आहे. आवश्यकत ती माहिती संबंधित प्रवाशांना द्यायला पाहिजे. आपण डॉक्टर आहोत. बहिणीच्या निधनामुळे तिच्या अंतिम दर्शनाला वेळेवर जाता यावे म्हणून अनेक शस्त्रक्रिया टाळल्या. प्रदीर्घ वेळ झाली म्हणून सुरक्षा दलाने कुण्या प्रवाशाला परतसुद्धा जाऊ दिले नाही, असे सांगून डॉ. भंभानी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.