नागपूर : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा (एनएमसी) निरीक्षणात गोंदिया मेडिकलमधील रिक्त जागा लपविण्यासाठी नागपूर मेडिकलच्या १९ डॉक्टरांची उसनवारी तत्त्वावर प्रतिनियुक्ती दाखविण्यात आली. आता चंद्रपूर मेडिकलमध्येही हाच घोळ घालण्यात आला आहे. येथील ७२ रिक्त जागेवर पुन्हा नागपूर मेडिकलसह मेयो, यवतमाळ, औरंगाबाद व जळगावमधील डॉक्टरांना प्रतिनियुक्तीवर दाखविण्यात आले आहे. ‘एनएमसी’ची ही एक प्रकारे दिशाभूलच असल्याचे बोलले जात आहे.
गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा (मेडिकल) तपासणीत डॉक्टरांच्या रिक्त पदांवर ‘एनएमसी’ बोट ठेवू नये म्हणून वैद्यकीय शिक्षण विभागाने मेडिकलचे ६ प्राध्यापक व १३ सहयोगी प्राध्यापक, अशा एकूण १९ डॉक्टरांची गोंदिया मेडिकलमध्ये उसनवारी तत्त्वावर प्रतिनियुक्ती दाखविली होती. याला महिना होता नाही तोच आता चंद्रपूर मेडिकलमधील ७२ रिक्त जागा लपविण्यासाठी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक व वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या प्रतिनियुक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत. यात पुन्हा नागपूर मेडिकलमधील जवळपास ४९, नागपूर मेयोमधील १६, यवतमाळ मेडिकलमधील ४, तर औरंगाबाद, अकोला व जळगावमधील प्रत्येकी १ डॉक्टरांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.
-गोंदियातील प्रतिनियुक्तीचे डॉक्टर चंद्रपूरमध्येही
‘एनएमसी’कडून मागील महिन्यात झालेल्या गोंदिया मेडिकलमधील निरीक्षणात नागपूर मेडिकलमधील १९ डॉक्टरांमधील पाच डॉक्टरांची प्रतिनियुक्ती चंद्रपूर मेडिकलमध्येही दाखविण्यात आली आहे. हा तरी घोळ ‘राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगा’चा लक्षात येईल का? असा प्रश्न आहे.
-न्यायालयाने स्वत:हून दखल घ्यावी!
सर्वच जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उघडण्याची घोषणा केली जात असताना, आहे त्या महाविद्यालयात रिक्त जागा भरण्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे चांगले डॉक्टर घडविण्यासोबतच रुग्णसेवेवरही याचा प्रभाव पडत आहे. यातच रिक्त जागा लपविण्यासाठी उसनवारी तत्त्वावर प्रतिनियुक्ती केली जात आहे. याची न्यायालय स्वत:हून दखल घेणार का, असा सवाल डॉक्टरांनी उपस्थित केला आहे.