पोलिसांनी दबाव झुगारून निष्पक्षपणे काम करावं, उपमुख्यमंत्र्यांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 08:40 PM2022-04-29T20:40:25+5:302022-04-29T20:41:10+5:30
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी पोलिसांच्या कामाची प्रशंसा करतानाच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेकांना कानपिचक्याही दिल्या.
नागपूर- एखाद्या विशिष्ट व्यक्तीने सांगितले म्हणून त्याच्या मनाप्रमाणे पोलिसांनी काम करू नये. सोबतच हा आपला, तो त्यांचा, असा भेद करून कुणावर अन्याय अथवा कुणाला फायदा पोहचविण्याचाही पोलिसांनी प्रयत्न करू नये, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे पोलिसांना दिला. सुमारे १०० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सुसज्ज अशा पोलीस भवनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, क्रीडा मंत्री सुनील केदार, पोलीस महासंचालक रजनिश सेठ, गृहनिर्माण मंडळाचे महासंचालक विवेक फनसाळकर, अतिरिक्त महासंचालक अर्चना त्यागी, विशेष पोलीस महानिरीक्षक (नागपूर रेंज) छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक (गोंदिया-गडचिरोली) संदीप पाटील, अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक विजय मगर उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी पोलिसांच्या कामाची प्रशंसा करतानाच वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेकांना कानपिचक्याही दिल्या. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे त्यांच्या कनिष्ठांसोबत चांगले वर्तन नसते. ही बाब चांगली नाही, असे ते म्हणाले. जोपर्यंत जनतेच्या मनात असते आम्ही खुर्चीवर असतो. त्याचप्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणांचीही एक विशिष्ट मुदत असते. आपणही कधी कुणाचे ज्युनिअर होतो, याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने नेहमी भान ठेवले पाहिजे. त्याचप्रमाणे आम्ही जनतेच्या सेवेसाठी आहोत. त्यामुळे ‘हा आपला तो त्यांचा’ असा दुजाभाव करू नये. चांगले काम करून पोलीस आपली चांगली प्रतिमा निर्माण करू शकतात, असे पवार म्हणाले.
यावेळी गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, अलिकडे निरर्थक गोष्टींचा इश्यू करून सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. मालेगाव, अमरावतीत झालेल्या घटनांचा ओझरता उल्लेख करत, काही जण राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची बोंब उठवतात, असे ते म्हणाले. बेरोजगारीच्या समस्येपेक्षा ‘त्यांना’ भोंग्याचा प्रश्न अधिक महत्वाचा वाटतो, असा चिमटाही त्यांनी विरोधकांना काढला. नागरिकांच्या समस्येचे निराकरण करून त्यांना आपलेपणाची वागणूक देण्याचा हितोपदेश गृहमंत्री वळसे पाटलांनी पोलिसांना दिला.
नागपुरातील गुन्हेगारी नियंत्रीत केल्याबद्दल शहर पोलिसांच्या कार्यपद्धतीचे काैतूक केले. नागपुरातील गुन्हेगार आजुबाजुच्या गावांत पळून जातात, त्यामुळे ग्रामीण पोलिसांची जबाबदारी अधिक वाढली असल्याचेही ते म्हणाले. व्यसनाधीनतेवर चिंता व्यक्त करून त्यांनी कोणत्याही आरोपीची गय करू नये, असे ठणकावून सरकारचे याबाबतचे ‘झिरो टॉरलन्स’चे धोरण असल्याचे स्पष्ट केले.
तत्पूर्वी पालकमंत्री डॉ. राऊत यांनी शहर पोलिसांच्या कार्याचा आढावा घेत पोलिसांचे काैतूक केले. तर, क्रीडा मंत्री केदार यांनी मोटर व्हेईकल अॅक्टमध्ये सुधारणा करण्याकडे लक्ष वेधले. प्रारंभी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील गुन्हेगारी आणि पोलिसांच्या भूमीकेचा आढावा घेतला. या देखण्या वास्तूच्या उभारणीसाठी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यापूर्वीचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम आणि डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांचे आभार मानले.
यापुढे पोलिसांना सरकारतर्फे कर्ज... -
जिर्न झालेल्या राज्यातील ८७ पोलीस ठाण्याच्या नवीन वास्तू आणि निवासस्थाने बांधण्यात येणार आहे. यापुढे पोलिसांना सरकारतर्फे कर्ज उपलब्ध करून देण्याचाही निर्णय गुरुवारी मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
५२०० झाले, आता आणखी ७ हजार पोलीस -
५२०० पोलिसांची भरती प्रक्रिया झाली आता नव्याने ७ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, पोलीस दलाचे मणूष्यबळ वाढवण्याला सरकारचे प्राधान्य.