ऑनलाइन गेमिंगमध्ये करचोरी करणाऱ्यांचा 'खेळ खल्लास' होणार; अजित पवारांनी मांडलं विधेयक!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 03:08 PM2023-12-08T15:08:17+5:302023-12-08T15:14:51+5:30

उपसमितीने एकूण टर्नओव्हरच्या रकमेवर २८ टक्के कर आकारण्याची शिफारस जीएसटी कौन्सिलकडे केली होती.

Deputy Chief Minister Ajit Pawar introduced a bill in the Winter Session to prevent tax evasion in online gaming | ऑनलाइन गेमिंगमध्ये करचोरी करणाऱ्यांचा 'खेळ खल्लास' होणार; अजित पवारांनी मांडलं विधेयक!

ऑनलाइन गेमिंगमध्ये करचोरी करणाऱ्यांचा 'खेळ खल्लास' होणार; अजित पवारांनी मांडलं विधेयक!

नागपूर : भारतात अलीकडच्या काळात ऑनलाइन गेमिंगचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. महाराष्ट्रदेखील याला अपवाद नाही. मात्र ऑनलाइन गेमिंगच्या संदर्भात पळवाटा शोधून कमी कर भरण्याची वृत्ती या गेमचालकांची असल्याचं अनेकदा बघायला मिळतं. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एक महत्त्वाचं विधेयक मांडलं आहे. जीएसटी कायद्यातील ऑनलाइन गेमिंग, घोड्यांच्या शर्यतींची (अश्वशर्यती) व्याख्या तसेच इतर कलमांमध्ये व्यापकता, स्पष्टता आणण्यासाठी अजित पवार यांनी विधानसभेत मांडलेलं जीएसटी सुधारणा विधेयक आज मंजूर करण्यात आलं आहे.

जीएसटी सुधारणा विधेयक सभागृहात मांडताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "जीएसटी लागू झाल्यानंतर कराच्या संदर्भातील निर्णय जीएसटी कौन्सिलकडून घेतला जातो. त्यानुसार राज्यांना अधिनियमात सुधारणा करावी लागते. ऑनलाइन गेमिंग आणि घोड्यांच्या शर्यती (अश्वशर्यती) याबाबतीत आणि इतर काही छोट्या कलमांमध्ये अधिक व्यापकता आणण्याची गरज होती. अलीकडेच १८ ऑगस्ट, २०२३ ला केंद्र सरकारने केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा, २०१७ मध्ये उपसमितीच्या शिफारशीनुसार दुरुस्त्या केल्या. आता केंद्रीय वस्तू व सेवा कर कायदा आणि महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा यात समानता आणण्याची गरज होती.  त्यामुळे महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियमात आपण सुधारणा करत आहोत. ही सुधारणा तातडीने करण्याची गरज होती. पण त्यावेळी अधिवेशन सुरु नव्हते. त्यामुळे सरकारने अध्यादेश काढला. (२६ सप्टेंबर, २०२३ – महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा अध्यादेश, २०२३). आता या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठी आपण हे विधेयक आणलेले आहे."

दरम्यान, ऑनलाइन गेमिंगच्या संदर्भात पळवाटा शोधून कमी कर भरण्याची वृत्ती या गेमचालकांची होती.  ऑनलाइन गेम ‘कौशल्याचे गेम’ (गेम ऑफ स्किल) असल्यामुळे आकारलेल्या शुल्कावर १८ टक्केच कर ते भरत होते. हे सर्व गेम २८ टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणण्याची आवश्यकता होती. त्यामुळे यासंदर्भात नियुक्त अभ्यास समितीने हे खेळ “गेम ऑफ स्किल” नसून “गेम ऑफ चान्स” आहेत, असा निष्कर्ष काढला.    

यासंदर्भातील उपसमितीने एकूण टर्नओव्हरच्या रकमेवर २८ टक्के कर आकारण्याची शिफारस जीएसटी कौन्सिलला केली होती. कौन्सिलनेही ही शिफारस मान्य केली, त्यानंतर  मागच्या अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहांनी त्याप्रमाणे कायदा दुरुस्ती मंजूर केली. आज  राज्याच्या कायद्यात बदल करण्यासाठी हे विधेयक मांडण्यात आलं आहे.

Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar introduced a bill in the Winter Session to prevent tax evasion in online gaming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.