जितेंद्र ढवळे, नागपूर : महाराष्ट्र हे देशात नेहमीच अग्रेसर राज्य राहिले आहे. आगामी काळात महाराष्ट्राला 'ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी' असणारे राज्य करू, असा निर्धार उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.नागपूर येथील कस्तुरचंद पार्क मैदानावर राज्याच्या ६३ व्या वर्धापन दिनाच्या ध्वजवंदनानंतर त्यांनी जनतेला संबोधित केले.
फडणवीस म्हणाले, नागपूर जिल्ह्याला अर्थसंकल्पातून भरीव निधी देण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात नागपूर-गोवा मार्गासाठी ८६ हजार ३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ६ हजार ७०८ कोटी रुपये, मिहान प्रकल्पासाठी आणखी १०० कोटी रुपये, नागपूरच्या विभागीय क्रीडा संकुलासाठी १०० कोटी रुपये, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्रासाठी २२८ कोटी रूपये,शैक्षणिक क्षेत्रात शंभर वर्ष पूर्ण करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ५० कोटी रुपये, संत्रा प्रक्रिया केंद्रासाठी २० कोटी रुपये, विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त १० कोटी रुपये, संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरीसाठी ६ कोटी रुपये,लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूरला अभिमत विद्यापीठाचा दर्जा, महाराष्ट्र विधी विद्यापीठ इमारतीसाठी निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला आहे.
या सोहळ्याला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्ह्यातील विविध पदावरील सनदी अधिकारी उपस्थित होते.
या ठिकाणी विविध पथकांमार्फत संचलन करण्यात आले. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला.