नागपूर - काैशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय मुख्यालयाचा उपायुक्त सुनील रामभाऊ काळबांडे (वय ५५) याला २५ हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्याच्या मुसक्या बांधल्या. विशेष म्हणजे, त्याने चंद्रपूरच्या बालाजी वाॅर्डात राहणाऱ्या आणि याच विभागात कार्यरत असलेल्या लिपिकाला लाचेसाठी वेठीस धरले होते. संबंधित लिपिकाने कनिष्ठ अधिकारी म्हणून पदोन्नती व पदस्थापना मिळण्यासाठी चंद्रपूर कार्यालयातील वरिष्ठांमार्फत फेब्रुवारी २०२१ मध्ये कागदोपत्री अहवाल पाठवला होता. १६ मार्चला आरोपी सुनील काळबांडेने लिपिकाला फोन केला. हा अहवाल मुंबई कार्यालयात पाठवून तेथील अधिकाऱ्यांशी आपण बोलणी केल्याचे सांगून हे काम करून देण्यासाठी २५ हजारांची लाच मागितली. आपल्या हक्काची पदोन्नती आणि पदस्थापना मागत असल्यामुळे लाच द्यायची नाही, असे ठरवून लिपिकाने कायदेशीर मार्ग अवलंबला; मात्र काळबांडेने लाच मिळावी म्हणून खोडा घातल्याने त्यांनी सरळ एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्याकडे तक्रार नोंदवली. उपअधीक्षक योगिता चाफले यांच्याकडून तक्रारीची शहानिशा करून घेतल्यानंतर सापळा लावण्यात आला. त्यानुसार, शुक्रवारी सायंकाळी लाचेची रक्कम घेऊन लिपिक नागपुरातील काळबांडेच्या कार्यालयात गेले. तेथे त्यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईमुळे कार्यालय परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. काळबांडेविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
---
घर आणि कार्यालयाची झडती
या कारवाईनंतर काळबांडेच्या कार्यालयात तसेच निवासस्थानी एसीबीच्या वेगवेगळ्या पथकाने झडती घेतली. या ठिकाणी काय मिळाले, ते रात्रीपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक योगिता चाफले तसेच कर्मचारी रविकांत डहाट, अमोल मेंघरे, अनिल बहिरे, अस्मिता मेश्राम आणि प्रिया नेवरे यांनी ही कामगिरी बजावली.
----