योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: नागपूर पोलीस दलातील परिमंडळ तीनचे उपायुक्त गोरख भामरे यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने चांगलाच धक्का दिला आहे. ‘एनआयए’मध्ये प्रतिनियुक्ती दिल्यावरदेखील तेथे रुजू न झाल्याबाबत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय प्रतिनियुक्तीतून त्यांना पाच वर्षे ‘डिबार’ करण्यात आले आहे. याशिवाय या कालावधीत त्यांना विदेशी जबाबदाऱ्यादेखील देण्यापासून मनाई करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या गृहविभागाचे अवर सचिव संजीव कुमार यांनी याबाबत निर्देश जारी केले आहेत. गृह विभागातर्फे अधिकाऱ्यांना विविध ठिकाणी प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येते. ठराविक कालावधीत अधिकाऱ्यांना तेथे सेवा द्यावी लागते. २०१७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या गोरख भामरे यांची नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीत अधीक्षकपदी प्रतिनियुक्ती झाली होती. मात्र तेथे ते रुजूच झाले नाही. याबाबतीत गृहमंत्रालयाकडून पत्रव्यवहार करण्यात आला. त्यामुळे अखेर गृहमंत्रालयाने त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे निर्देश जारी केले व तसे पत्र राज्याच्या मुख्य सचिवांना पाठविले. मात्र सोबतच गृहमंत्रालयाच्या नियमावलीनुसार १४ जून २०२३ पासून पाच वर्षे भामरे यांना केंद्रीय पातळीवर प्रतिनियुक्ती मिळणार नाही तसेच त्यांना या कालावधीत त्यांना विदेशातील कामगिरी किंवा कन्सल्टन्सी देण्यापासून मनाई करण्यात आली आहे.