लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रणजित देशमुख यांनी चक्क धाकटा पुत्र डॉ. अमोल याच्या विरोधात मानसिक छळवणुकीची तसेच घरावर कब्जा केल्याची तक्रार सीताबर्डी पोलिसात केली. या तक्रारीनंतर देशमुख कुटुंबीयांसह राजकीय वर्तुळात वादळ उठले. मात्र, २४ तासानंतर सर्वकाही सेटल झाले. देशमुख कुटुंबीयांशी सलगी असणाऱ्यांनी मध्यस्थी केली व शेवटी रणजितबाबू यांनी मुलाविरोधातील तक्रार मागे घेतली. मात्र, सोबतच मुलाने आपले घर सोडावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.सिव्हिल लाईन्स येथील आपल्या घराच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर अमोल याने अवैधरीत्या कब्जा केला आहे. वारंवार सांगूनही तो घर रिकामे करण्यास तयार नाही. त्यामुळे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार रणजितबाबू यांनी सोमवारी दाखल केली होती. तक्रारीमुळे देशमुख पिता-पुत्रातील वाद चव्हाट्यावर आला होता. रणजित देशमुख यांचे आमदार डॉ. आशिष देशमुख व डॉ. अमोल देशमुख हे दोन पुत्र आहेत. डॉ. आशिष हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ‘बरकत’ या बंगल्यात स्वतंत्र राहतात. तर डॉ. अमोल हे रणजितबाबू यांच्या जीपीओ चौकातील घरात वास्तव्यास होते. देशमुख हे सध्या वयाच्या सत्तरीत असून पार्किन्सन आजाराने ग्रस्त आहेत. सोमवारी दिवसभर सीताबर्डी पोलिसांनी याप्रकरणी कुठलीही कारवाई केली नाही. आपल्या मुलाने घराचे कुलूप तोडून कथित भागावर कब्जा केल्याचे देशमुख यांनी तक्रारीत म्हटले होते. याप्रकरणी देशमुख यांची तक्रार प्राप्त झाल्याचे सीताबर्डी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत खराबे यांनी स्पष्ट केले होते. तक्रारीनंतर अमोल यांनी रणजितबाबू यांची भेट घेतली. त्यांचा गैरसमज दूर केला. तुम्ही माझे वडील आहात, तुमचे घर बळकावून मी काय साध्य करू, असे सांगत घर सोडण्याची तयारी दर्शविली व वेळ मागितला. याबाबत लोकमतशी बोलतानना रणजितबाबू म्हणाले, मला माझ्या घरात मुलांचा हस्तक्षेप नको आहे. सिव्हिल लाईन्स येथील घर रिकामे करण्यासाठी मी गेल्या दोन वर्षांपासून सांगत आहे. मात्र, त्याने ऐकले नाही. त्याच्या वास्तव्यामुळे माझी प्रायव्हसी भंग होत आहे. मी वारंवार सांगूनही काहीच परिणाम झालेला नाही. त्यामुळे मला नाईलाजास्तव पोलिसात धाव घ्यावी लागली. मात्र, हितचिंतकांनी मध्यस्थी केल्यानंतर आमच्यातील वाद क्षमला आहे. अमोलने आपले घर खाली करावे, एवढीच आपली अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
माझ्यासाठी वडील नेहमीच पूज्यनीय : अमोल देशमुखया प्रकरणाबाबत अमोल देशमुख लोकमतशी बोलताना म्हणाले, माझे वडील माझ्यासाठी नेहमीच पूज्यनीय आहेत. मी वेळोवेळी त्यांच्या आजारपणाची काळजी घेतली. काही दिवसांपूर्वीच मी त्यांना आकस्मिकपणे वोक्हार्टमध्ये भरती केले होते. त्यांचा माझ्याबाबत गैरसमज झाला होता. मी त्यांची भेट घेऊन गैरसमज दूर केला. त्यांचे आशीर्वादही घेतले. काही लोक आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते कशासाठी हे करीत आहे, बाहेरचे आहेत की घरचे हे कळायला मार्ग नाही. पण वडिलांची दिशाभूल करून माझी बदनामी करण्यासाठी हा प्रकार करवून घेण्यात आल्याचा संशय आहे. माझ्यासाठी वडिलांच्या आशीर्वादाचे छत्र असले तरी पुरेसे आहे.