नागपूर : स्वतंत्र विदर्भ आंदोलनाचे वेळोवेळी बिगुल वाजवून माजी मंत्री रणजित देशमुख व दत्ता मेघे या दोन नेत्यांनी पक्षश्रेष्ठीना ब्लॅकमेल क रून स्वत: च्या पदरात पदे पाडून घेतली. आताही विदर्भाच्या आंदोलनात सहभाग घेऊ न दबाव निर्माण करून भाजपला ब्लॅकमेल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या नेत्यांचे विदर्भ आंदोलन वैयक्तिक स्वार्थासाठी असल्याची टीका माजीमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. ज्या पक्षाने आमदारकी, खासदारकी, मंत्री पदे व प्रदेशाध्यक्षपद दिले. त्या पक्षासोबत रणजित देशमुख व दत्ता मेघे हे प्रामाणिक राहू शकले नाहीत. या नेत्यांनी भूतकाळात विदर्भ आंदोलनाचा स्वत:च्या फायद्यासाठीच वापर करून घेतला. विदर्भातील लोकांचा त्यांच्यावरील विश्वासच उडाला आहे. त्यामुळे विदर्भाच्या आंदोलनाची धुरा एखाद्या चांगल्या अराजकीय नेत्यांच्या हाती द्यावी. असे केल्यास नवीन मंडळी या आंदोलनात सहभागी होतील. सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विदर्भासंदर्भात आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. वैदर्भीय जनतेची मागणी असेल तर विदर्भ वेगळा झालाच पाहिजे. यासाठी विदर्भातील सर्व जिल्ह्यातील जनमताचा कौल घेतल्यास यातून जनभावना स्पष्ट होतील. सत्तेत नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन केले होते. आता केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे. भाजपने जर वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव लोकसभा व विधानसभेत आणला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व आमदार या प्रस्तावाला पाठिंबा देतील, अशी ग्वाही देशमुख यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे, वेदप्रकाश आर्य, शब्बीर विद्रोही, ईश्वर बाळबुधे, अनिल अहिरकर, बजरंगसिंग परिहार, सुखदेव वंजारी, अविनाश गोतमारे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
देशमुख-मेघे यांचे आंदोलन वैयक्तिक स्वार्थासाठी
By admin | Published: January 21, 2016 2:44 AM