आॅनलाईन लोकमतनागपूर : मेट्रो रेल्वे स्थानकाला आगळेवेगळे रूप देण्याचा प्रयत्न महामेट्रो करीत आहे. त्याअंतर्गत खापरी मेट्रो स्टेशनचे डिझाईन मुंबईच्या बांद्रा स्टेशनच्या धर्तीवर राहणार आहे. हे स्टेशन कुशल कारागिरी आणि कोरीव नक्षीकामाचा एक नमुना ठरणार आहे. खापरी स्टेशन भविष्यात प्रवाशांसाठीच नव्हे तर पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.स्टेशनवर संगमरवर, ज्यूट, सिरॅमिक आणि कांस्य यांच्या साहाय्याने भिंतीचित्रे, शिल्प, धातू, पेंटिंग्ज तयार करून आकर्षक दिसेल अशी निर्मिती करण्यात येत आहे. खापरी स्टेशन नागपूर-वर्धा महामार्गावर असल्याने ते या भागातील मिहान आणि इतर व्यावसायिक क्षेत्रात नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या आयुष्याची लाईफलाईन ठरणार आहे.सप्टेंबरमध्ये मेट्रोचे यशस्वी ट्रायल रन झाल्यानंतर आरडीएसओने या मार्गावर मेट्रोला हिरवी झेंडी दिली. एअरपोर्ट ते खापरी मार्गावर लवकरच कमर्शियल रन सुरू होणार आहे. गेल्यावर्षी १२ आॅगस्टला स्टेशनचे भूमिपूजन करून बांधकामाला सुरुवात झाली. प्रवाशांसाठी सविस्तर माहिती देण्यासाठी माहिती कक्ष राहील. दिव्यांग आणि लहान मुलांकरिता विशेष लिफ्ट, वेगवेगळे तिकीट काऊंटर आणि स्वच्छतागृह राहील. नेत्रहीनांसाठी विशेष लिफ्ट असून ती ब्रेल भाषेच्या साहाय्याने वापरता येईल. स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर प्रवेशापूर्वीच आॅटोमेटिक फेअर कलेक्शन सिस्टम गेट लावण्यात येत आहे. हे गेट क्यूआर कोडच्या माध्यमातून चालू व बंद होईल. यासाठी सिंगल प्रवास, परतीचा प्रवास आणि ग्रुप तिकीट या तीन प्रकारचे क्यूआर कोड तिकीट काऊंटरवर उपलब्ध असतील. भविष्यात आधुनिक सोईसुविधांनी परिपूर्ण खापरी स्टेशन लोकांच्या पसंतीस खरे उतरणार आहे.मेट्रोच्या अतिरिक्त तीन डब्यांचे आगमनमेट्रो रेल्वेच्या कमर्शियल रनची तयारी जोरात सुरू असतानाच दुसरीकडे मेट्रोच्या अतिरिक्त तीन डब्यांचे हैदराबाद येथून ५०० कि़मी.चे अंतर कापत नागपुरात आगमन झाले आहे. एकूण ६७ मीटर लांबीच्या डब्यांवर पूर्वीप्रमाणेच ग्रीनसिटी आणि संत्रानगरी अशी ओळख देण्यात आली आहे. आगमनाप्रसंगी मिहान डेपोचे सहमहाव्यवस्थापक साई सरन दीक्षित, वरिष्ठ महाव्यवस्थापक (रोलिंग स्टॉक) नरेंद्र उपाध्याय आणि उपमहाव्यवस्थापक (रोलिंग स्टॉक) आर.आर. रमण उपस्थित होते. यापूर्वी मेट्रोचे तीन डब्बे ट्रायल रनसाठी हैदराबाद येथून आणण्यात आले आहेत.