सोईनुसार प्रभाग रचना : पदाधिकाऱ्यांकडून मर्जीतील नगरसेवकांना विचारणा नागपूर : राज्यातील महापालिकांच्या आगामी निवडणुका चार सदस्यीय रचनेनुसार होणार आहेत. त्यानुसार नवीन प्रभागरचनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. परंतु नवीन आराखडा विभागीय आयुक्तांना सादर करण्यापूर्वीच काही पदाधिकाऱ्यांना याची पूर्वकल्पना होती. त्यामुळे हा आराखडा सादर होण्यापूर्वीच फुटल्याची महापालिकेत गुरुवारी जोरदार चर्चा होती. महानगरपालिकेची निवडणूक सोईची जावी यासाठी काही वजनदार नगरसेवकांनी आपल्या मर्जीनुसार नवीन प्रभागाची रचना करून घेतली. काही नगरसेवकांना पदाधिकाऱ्यांनीच विचारणा करून प्रभागात कोणत्या वस्त्यांचा समावेश सोईचा राहील याची माहिती जाणून घेतली. त्यानुसार प्रभागाची रचना करण्यात आली. त्यामुळे नवीन प्रभागरचनेची अनेकांना पूर्वकल्पना असल्याने त्यांनी निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रभाग रचना करताना जुन्या वॉर्डाची रचना, प्रमुख रस्ते, गट यांचा विचार करणे आवश्यक असते. परंतु यात पळवाटा शोधून काही नगरसेवकांच्या सोईची प्रभाग रचना करण्यात आल्याची माहिती काही नगरसेवकांनी दिली.७ सप्टेंबरला प्रभाग रचनेचा आराखडा विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला. त्यामुळे काही नगरसेवकांनी पदाधिकाऱ्यांना फोनवरून विचारणा करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना प्र्रतिसाद मिळाला नाही. प्रभाग रचनेचा आराखडा गोपनीय असल्याचा भास निर्माण करण्यात आला. वास्तविक काही दिवसापूर्वीच प्रभाग रचनेचा नवीन आराखडा निश्चित करण्यात आला होता. विरोधी पक्षाच्या काही नगरसेवकांच्या प्रभागाचे तुकडे करून विविध प्रभागांना जोडण्यात आले तर काही जुने प्रभाग कायम ठेवून त्याला नवीन भाग जोडण्यात आल्याची माहिती आहे. विशिष्ट वस्त्यांतील मतदारांच्या बळावर अनेक नगरसेवक निवडून येत होेते. नवीन प्रभाग रचनेत अशा वस्त्या वेगवेगळ्या प्रभागांना जोडण्यात आल्याची चर्चा असल्याने नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे. यासंदर्भात काहींनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तो होऊ शकला नाही.(प्रतिनिधी)
प्रभाग रचनेचा आराखडा फुटला?
By admin | Published: September 09, 2016 3:04 AM